कर्नाटक पोलिसांच्या मारहाणीत जवान जखमी
By Admin | Published: May 18, 2015 12:56 AM2015-05-18T00:56:11+5:302015-05-18T00:56:50+5:30
पोलिसांत तक्रार : महाराष्ट्र हद्दीत घटना; लष्करी जवान कावजी खोतवाडीचा
मिरज : पोलिसांशी वादावादी केल्याच्या कारणावरून मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडी येथील भारतीय लष्करातील जवान प्रमोद पतंगराव पाटील (वय ३८) यांना कागवाड पोलिसांनी सीमा ओलांडून म्हैसाळ हद्दीत येऊन बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या पाटील यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे.
लष्करात सिकंदराबाद येथे नाईक म्हणून काम करणारे प्रमोद पाटील हे दि. ३ मे रोजी कुटुंबीयांसोबत मालवाहू रिक्षातून कर्नाटकात मायाक्का चिंचणी येथे देवदर्शनासाठी जात असताना कागवाड येथे पोलिसांनी
त्यांना अडविले. मालवाहू रिक्षातून प्रवास करीत असल्याच्या कारणावरून वादावादी झाल्याने कागवाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी प्रमोद पाटील व रिक्षाचालक किशोर मुळीक यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अथणी न्यायालयात जामिनावर मुक्तता झाल्यानंतर प्रमोद पाटील यांनी कागवाड पोलिसांनी जप्त केलेला वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाची कागदपत्रे मागितली होती. मात्र, कागवाड पोलिसांनी वाहन चालविण्याचा परवाना हरविल्याचा पवित्रा घेतल्याने प्रमोद पाटील व उपनिरीक्षक श्रीशैल कौजलगी यांच्यात वादावादी झाली.
परवाना परत देत नसल्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगून प्रमोद पाटील शनिवारी सायंकाळी कागवाड येथून मोटारसायकलवरून परत मिरजेकडे येत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल कौजलगी यांच्यासह बसाप्पा व संतोष नामक पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस जीपमधून (केए २२, जी ३६८) पाटील यांचा पाठलाग केला. सीमा ओलांडून म्हैसाळजवळ येऊन उपनिरीक्षक कौजलगी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रमोद पाटील यांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार आहे. मारहाणीत जखमी पाटील यांना रस्त्याकडेला टाकून कर्नाटक पोलीस परत निघून गेले. रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांनी प्रमोद पाटील यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मारहाणीबाबत प्रमोद पाटील यांनी मिरज पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)