दानातून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:49 PM2019-05-19T23:49:34+5:302019-05-19T23:49:39+5:30
इंद्रजित देशमुख कायिक दानाच्या बाबतीत विचार करू लागलो की, मनात आमच्या दायित्वाबद्दल विचार येतो की, आज कशाचं दान करावं? ...
इंद्रजित देशमुख
कायिक दानाच्या बाबतीत विचार करू लागलो की, मनात आमच्या दायित्वाबद्दल विचार येतो की, आज कशाचं दान करावं? आणि किती करावं? कारण दान करायचं झालं तर एकतर आमच्याकडे दान देण्याइतकं परिपूर्णत्व नसतं किंवा जे आहे ते अपूर्ण असल्यास ते देण्याबद्दल संकोच असू शकतो. त्यासाठी आम्ही ऐकलेली गोष्ट आहे. रामायणामध्ये ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचे सेतूचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी कपिवर मोठं-मोठाल्या शिळा उचलून पाण्यात टाकत होते. या सगळ्या गडबडीत एक टिटवी या सर्वांसोबत समुद्राकाठची थोडी-थोडी वाळू आपल्या चोचीतून आणून त्या बांधकामाच्या ठिकाणी टाकत होती म्हणजेच या महानकार्याला अनुमोदन देत होती. आपल्या या अनोख्या कृतीने तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हे सगळं पाहून तिला कमी लेखण्याच्या उद्देशाने कुणीतरी तिला विचारलं की, ‘एवढ्या मोठ्या सेतूबंधनाच्या कामात तू टाकत असलेल्या चिमूटभर वाळूने अशी कोणती भर पडणार आहे. त्यापेक्षा तू विनाकारण शरीराला श्रम न देता शांत का बसत नाहीस.’ त्याला टिटवीने दिलेलं उत्तर सर्वांना दानाबद्दलच्या संकुचितता सोडायला लावणारं आहे. ती टिटवी म्हणते, ‘या सेतूबंधनाच्या कामात माझ्या शरीराद्वारे देता येणारं योगदान खूप कमी असेल, माझ्याकडून या बांधकामात अर्पण होणारी वाळूही कमी असेल, पण भविष्यात ज्यावेळी या सेतूबंधनाच्या कामाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी त्या इतिहासात या सेतूबंधनाच्या कामाद्वारे समाजाचा प्रवास सुखी करण्यासाठी, सोप्या मार्गाची निर्मिती करण्यासाठी झटलेल्या आणि हे एवढं मोठं काम होत असताना निव्वळ पाहत बसलेल्या घटकांची यादी बनवली जाईल. त्यावेळी माझं नाव समाजासाठी जे सामर्थ्य होत ते पुरेपूर वापरून झटू पाहणाऱ्यांच्या यादीत असेल. माझं नाव काय करू आणि कसं करू म्हणून निव्वळ बघत बसणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल. माझं योगदान केवढंही असू दे मला त्यात समाधान असेल.’
या कथेतील टिटवीने दिलेलं उत्तर खूप परामर्शदायी आहे. आपल्याजवळ जे आहे ते दान देताना असा साहसी भाव आपल्याकडे असायला हवा.
याचसाठी महाराज एका ठिकाणी म्हणतात की,
‘झाला तरी होवो लौकिक सन्मान।
पोटी अभिमान धरू नये।
भुकेल्यासी अन्न सत्पात्री ते दान।
भावे दिल्याविण राहू नये।।’
आपल्याजवळ सन्मान अथवा अपमान या दोन्ही अभिनिवेशात जे आहे ते देण्याची धारकता असायला हवी. मग त्यात कोणताच संकोच असायला नको. संकोच करायचाच असेल तर दातृत्वाचा अहंकार न धरता आपण दान करतो त्यापेक्षा आपल्याला दान देता येण्यासारखं काहीतरी सामर्थ्य निसर्गाने दिलेलं आहे आणि त्या सामर्थ्याच्या अनुषंगाने कुणीतरी कशाच्या तरी माध्यमातून आपल्या दातृत्वाला संधी देण्याचा उपकार आपल्यावर करत आहे ही संधी आपल्या स्वभावातील कोणत्याच वैगुण्याने आपल्या हातून निसटायला नको याचा विचार करायला हवा. आपण करत असलेल्या कायिक, वाचिक आणि मानसिक योगदानाबद्दल निव्वळ स्वकर्तृत्वाचा अहंकार अजिबात असायला नको. कारण ज्या गोष्टींच योगदान आपण देणार आहोत ती गोष्ट आपल्याला निसर्गाने दिलेली असते आणि भरभरून दिलेली असते. अगदी ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर,
‘करणे का न करणे।
हे अवघे तोचि जाणे।
विश्व चळतसे जेणे।।
परमात्मेनि’
असं आमच्याकडील धारकतेच स्वरूप असतं, पण आम्हाला त्याचा विसर पडल्यामुळे आम्ही त्या धारकतेचा मालकी हक्क स्वत:कडे घेत असतो. त्याचमुळे आम्हाला त्रास होत असतो.
याउलट माऊली ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे
‘निर्गुणी येणे निराकारी जाणे।
सदा माझे राहणे निरंजन।’
या वचनाचा विचार करून जे दुसºयांकडून आपल्याला मिळालं आहे ते काही प्रमाणात तिसºयाला द्यायचं आणि त्यातून निर्माण होणारा आनंद मात्र आपण स्वत: उपभोगायचा हा किती सोपा कृतिभाव आहे की, ज्याचा जोपासनेमुळे आम्ही अधिक आनंदी होऊ शकतो. या आनंदासाठी जसं आमच्याकडे दान देण्यासाठी काहीतरी आवश्यक आहे त्यापेक्षा आमच्याकडून दान स्वीकारायला व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेच्या माध्यमातून आमच्यापुढे कुणीतरी उपलब्ध असणं गरजेचं आहे किंबहुना या प्रक्रियेत दात्यापेक्षा याचकच जास्त महत्त्वाचा आहे. कारण भौतिक जीवनात हे दाते आणि याचक एकमेकांना कृतज्ञभावाने कधीही उपयोगी पडू शकतात. मात्र, आम्ही या दातृत्वाची सुरुवात करायला हवी. ती केली की, आम्ही आमच्याकडून जे देऊ त्याच्या कितीतरी पटीने आम्हाला परत मिळत असते. आम्ही आमच्याकडून जगाला जे देऊ तेच आम्हाला जगाकडून परत मिळत असतं. त्याचसाठी आम्हाला उद्या जे हवं आहे ते आज दान देऊया आणि उद्या संपन्न होऊया.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)