उद्योजकांचे प्रश्न सोडवा,सन्मान द्या

By Admin | Published: December 27, 2014 12:44 AM2014-12-27T00:44:10+5:302014-12-27T00:48:43+5:30

राजेश क्षीरसागर : अधिकाऱ्यांना सूचना; जिल्ह्यातील उद्योजक - लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक

Solve and respect the entrepreneur's questions | उद्योजकांचे प्रश्न सोडवा,सन्मान द्या

उद्योजकांचे प्रश्न सोडवा,सन्मान द्या

googlenewsNext

शिरोली : उद्योजकांचे स्थानिक व प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवावेत. उद्योजकांशी सन्मानकारक वागा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दम आमदार राजेश क्षीरसागर यांनी औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या रामभाई सामाणी सभागृहात जिल्ह्यातील उद्योजक आणि लोकप्रतिनिधी यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
क्षीरसागर म्हणाले, उद्योजकांचे परवाने, उद्योग चालू करण्यासाठीचे प्रश्न, औद्योगिक वसाहतीतील समस्या, हे प्रश्न तत्काळ सोडवावेत. सोमवारी (दि. २९) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागतील, असेही क्षीरसागर म्हणाले.
या बैठकीत उद्योजकांनी औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात उद्योजक गेले की, तासन् तास उद्योजकांना बाहेर बसविले जाते. उद्योजकांचे परवाने मिळत नाहीत. क्षुल्लक गोष्टींना फेऱ्या माराव्या लागतात, असे प्रश्न उद्योजकांनी मांडले. कोल्हापुरात उद्योग टिकायचा असेल, तर वीजदर कमी करा आणि ऊर्जामंत्र्यांचे सचिव अजय मेहता त्यांना तेथून हकलून लावा. त्यांच्यामुळेच विजेचे दर वाढतात. वीजदर वाढविण्यात मेहतांचा मोठा हातखंडा आहे. त्यामुळे मेहतांना हाकला, अशी मागणी उद्योजकांनी केली. तसेच कंपाऊंड, इंडस्ट्रियल टाऊनशीप, हद्दवाढ, एलबीटी, टोल, वसाहतीमधील चोऱ्या, उद्योगांचे अनुदान, विमानसेवा, रेल्वे, रस्ते, आदी विषयांवर दोन तास चर्चा झाली. यावर क्षीरसागर यांनी उद्योजकांना सहकार्य करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले.
आमदार सुजित मिणचेकर यांनी औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणे काढण्यासाठी उद्योजक, टपरीधारक आणि अधिकारी यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. तसेच विमानसेवा सुरू नसल्यामुळे कोल्हापूरला मोठे उद्योजक येऊ शकले नाहीत हेही सत्य आहे; पण भविष्यात विमानसेवा नक्की सुरू होणार, असेही मिणचेकर यांनी सांगितले.
अमल महाडिक म्हणाले, राज्यातील उद्योजक बाहेर परराज्यात जाऊ नयेत, तसेच उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कोल्हापूरला बोलावले आहे. तसेच सोशल मीडियामुळे उद्योजक जवळ आले आहेत. अधिकाऱ्यांनी उद्योजकांचे प्रश्न सोडवून सोशल मीडियावर त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. मार्च २०१५ पर्यंत उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न अधिकाऱ्यांनी मार्गी लावावेत.
बैठकीस अध्यक्ष रवींद्र तेंडुलकर, स्मॅकचे सुरेंद्र जैन, राजू पाटील, देवेंद्र ओबेरॉय, रामराजे बदले, गोशिमाचे अध्यक्ष अजित आजरी, उदय दुधाणे, चंद्रकांत जाधव, श्यामसुंदर जोतला, मोहन कुशिरे, संजय पाटील, अधिकारी अशोक पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Solve and respect the entrepreneur's questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.