ॲट्रॉसिटीची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावा :भाऊसाहेब गलांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 03:20 PM2021-02-27T15:20:32+5:302021-02-27T15:27:08+5:30
Collcator Kolhapur-ॲट्रॉसिटीच्या गुन्हयातील तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलिसांनी तत्काळ मार्गी लावावीत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लवकरात-लवकर होण्यासाठी कागदपत्रे समाज कल्याण विभागाला सादर करावीत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केली.
कोल्हापूर : ॲट्रॉसिटीच्या गुन्हयातील तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलिसांनी तत्काळ मार्गी लावावीत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लवकरात-लवकर होण्यासाठी कागदपत्रे समाज कल्याण विभागाला सादर करावीत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनीता नाशिककर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, सहायक संचालक सरकारी अभियोक्ता नसरीन मणेर उपस्थित होते.
भाऊसाहेब गलांडे म्हणाले, उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता तपासावर प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे पोलीस विभागाने लवकरात लवकर मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरून पीडितांना अर्थसाहाय्य देता येईल.
सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी विषय वाचन केले. ॲट्रॉसिटीअंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या सद्य:स्थितीबाबत समावेश होता. जानेवारी महिन्यात एकूण १२ प्रकरणांपैकी सहा मंजूर असून, पोलिसांकडील कागदपत्रांअभावी सहा प्रलंबित प्रकरणे असल्याचे सांगितले.
आयत्या वेळच्या विषयात ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून घेण्याबाबत आलेल्या अर्जांविषयी पोलीस विभागाने योग्य ते सहकार्य करून कार्यवाही करावी. एप्रिल महिन्यात या कायद्याच्या जनजागृती आणि माहितीसाठी सर्व विभागप्रमुखांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.