ऑनलाईन बांधकाम प्रणालीतील अडचणी दूर करा : पालकमंत्री सतेज पाटील : क्रीडाई, सिव्हील इंजिनिअर्ससोबत घेतली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:28 AM2021-08-22T04:28:37+5:302021-08-22T04:28:37+5:30
कोल्हापूर : ऑनलाईन बांधकाम प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी नगरविकास पुणे विभागाचे सह संचालक ...
कोल्हापूर : ऑनलाईन बांधकाम प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी नगरविकास पुणे विभागाचे सह संचालक अविनाश पाटील यांना केल्या. बांधकाम परवानगी आणि इतर मागण्यांसंदर्भात क्रीडाई कोल्हापूर तसेच कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची संयुक्त बैठक पालकमंत्री पाटील यांच्यासोबत झाली. नागरिकांना आणि विकसकांना बांधकाम परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्या वेळेत देण्याबाबतही त्यांनी सक्त सूचना केल्या.
गेल्या तीन वर्षांपासून महापूर आणि कोरोनाच्या विळख्यात बांधकाम व्यावसायिक आहेत. आता कोरोनाच्या निर्बंधात शिथिलता दिल्याने नवीन बांधकाम प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत अनेकजण आहेत. मात्र, ऑनलाईन बांधकाम परवाना प्रणालीमध्ये त्रुटी असल्याने महानगरपालिकेच्या हद्दीतील बांधकाम प्रकल्पांना मंजुरीसाठी विलंब लागत आहे. नगररचना सहसंचालक अविनाश पाटील हे ऑनलाईन सहभागी झाले. क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी, बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे ऑनलाईन बांधकाम परवानगी लागू करण्याचा नगर विकास विभागाचा निर्णय चांगला असला तरी त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली. कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पवार यांनी बांधकामासंबंधी विकसकांना येणारे प्रश्न मांडले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगररचना सहायक संचालक रामचंद्र महाजन, उप शहर रचनाकार रमेश मस्कर, प्राधिकरणाचे संजय चव्हाण, क्रीडाईचे गौतम परमार, अजय डोईजड, अजय कोराणे, प्रमोद पवार, अनिल घाटगे, कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे जितेंद्र लोहार, विजय पाटील, आदी उपस्थित होते.
नाहक त्रास नको..
बांधकाम परवानगी देताना सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या, नागरिकांना आणि विकसकांना वेळेत बांधकाम परवानगी द्या, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. महापालिका आणि शासन स्तरावरील ज्या मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
फोटो : २१०८२०२१-कोल-क्रीडाई मीटिंग
कोल्हापुरात शनिवारी रात्री बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी क्रीडाई व कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.