ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवू, त्याची यादी द्या : नांगरे-पाटील
By admin | Published: May 13, 2017 05:20 PM2017-05-13T17:20:01+5:302017-05-13T17:20:01+5:30
‘फेस्कॉम’च्या मनोहारी मनोयुवा आनंद मेळाव्याचा समारोप
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : आजच्या घडीला माणसां-माणसामधील संवाद हरवत चालला आहे. नाती कमी होत चालली आहेत. युवा पिढीवर संस्कार कमी होत नाही. आपल्याला सहानुभुती नव्हे तर समानभुती पाहिजे आहे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू ; त्याची यादी मला द्या असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. ते महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) तर्फे आयोजित ‘मनोहारी मनोयुवा-आनंद मेळाव्याच्या समारोपप्रसंगी शाहू स्मारक भवनात बोलत होते.
तत्पुर्वी, डॉ. धनंजय गुंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, विसुभाऊ बापट यांनीही मार्गदर्शन केले. नांगरे-पाटील म्हणाले, माहिती व तंत्रज्ञान माहितीची देवाण-घेवाण झाली. पण, यामुळे दिवसेंदिवस कुटूंबातील संवाद कमी झाला. याचा परिणाम कुटूंब व्यवस्थेवर झाला, हे दुर्देव आहे. संस्कार करणारे कमी झाले. त्यामुळे आता सहानुभूती नव्हे तर समानभूती पाहिजे आहे.
या कार्यक्रमात डॉ. धनंजय गुंडे यांनी, टेन्शन बाँब -जणू अणूबाँब या विषयावर तर इंद्रजित देशमुख यांनी, ‘वृद्धाश्रम-एक नवा आयाम’ यावर मार्गदर्शन केले. तर विसुभाऊ बापट यांनी ‘कुटूंब रंगलय काव्यात’ ही मैफिल सादर केली. अध्यक्ष प्राचार्य एस.डी.साळुंखे, प्राचार्य य.ना.कदम, प्रा. श्रीपाल जर्दे, एस. डी. पाटणे, शाम सौंदलगे, प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे, अरविंद दिक्षित, श्रीनिवास कुरणे, प्राचार्य व्ही. डी. माने, सुरेश शहा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.