कचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात सोडवू

By admin | Published: September 21, 2016 12:34 AM2016-09-21T00:34:28+5:302016-09-21T00:42:25+5:30

पी. शिवशंकर : भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना आश्वासन

Solve the trash question in a month | कचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात सोडवू

कचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात सोडवू

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लागणाऱ्या चार नवीन आर. सी. वाहनांसह आवश्यक तेवढे कंटेनर खरेदी करून येत्या महिन्याभरात शहरातील कचरा उठावाचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी भाजप-ताराराणी आघाडी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले. घरोघरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रायोजकाच्या माध्यमातून कचराकुंड्या उपलब्ध करून देण्यावरसुद्धा यावेळी चर्चा झाली.
महानगरपालिकेची सभा तहकूब झाल्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील कचरा उठावातील अडचणींबाबत चर्चा केली. विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी शहरातील कचऱ्याचा उठाव पूर्ण क्षमतेने करावा, घंटागाड्यांची संख्या वाढवावी, प्रत्येक प्रभागात तीन-तीन घंटागाड्या द्याव्यात, कंटेनरची बांधणी महापालिकेच्या वर्कशॉपमध्येच केली जावी, आर.सी. वाहनांवर हायड्रॉलिक प्रणालीच्या वाहनांचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना केल्या.
सध्याच्या आर. सी. वाहनांत प्रमाणापेक्षा जादा कचरा तसेच खरमाती भरली जाते; त्यामुळे ही वाहने खराब झाली आहेत. त्यामुळे अशा प्रमाणापेक्षा जादा कचरा भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. महिन्याभरात प्राधान्याने नागरिकांच्या आरोग्याच्या, कचरा उठाव, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालावे, असे जाधव यांनी सांगितले.
घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास कचरा उठावाचे काम अधिक सुलभ होईल, असा मुद्दा चर्चेत पुढे आला. त्यावेळी संभाजी जाधव, सत्यजित कदम, सुनील कदम यांनी प्रायोजकांच्या माध्यमातून कचराकुंडी उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार केला जाईल. जर शक्य झाले तर अशा कचराकुंड्या दिल्या जातील, असे सांगितले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, नगरसेवक राजसिंह शेळके, संतोष गायकवाड, रूपाराणी निकम, जयश्री जाधव, भाग्यश्री शेटके, सविता भालकर, अश्विनी बारामते, पूजा नाईकनवरे, गीता गुरव, मनीषा कुंभार, नीलेश देसाई उपस्थित होते. (प्रतिनिधी)


काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिष्टमंडळही भेटले
महानगरपालिकेत भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेविकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा केल्याची माहिती कळताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविकाही आयुक्तांना भेटल्या. त्यांनीही कचऱ्यासह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालावे, असे आवाहन आयुक्तांना केले. महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, रिना कांबळे यांच्यासह काही नगरसेविकांचा त्यात समावेश होता.

Web Title: Solve the trash question in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.