ज्याचा जोर, त्याला जादा पाणी; कोल्हापुरात काही माजी नगरसेवकांनी स्वत:ची उभी केली यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 02:09 PM2023-04-11T14:09:48+5:302023-04-11T14:10:13+5:30

शहराच्या एका प्रभागात तर पाण्याचे व्हॉल्व्ह कायमचे सोडलेले

Some former councilors set up their own system, Water supply disrupted in some parts of Kolhapur city | ज्याचा जोर, त्याला जादा पाणी; कोल्हापुरात काही माजी नगरसेवकांनी स्वत:ची उभी केली यंत्रणा

ज्याचा जोर, त्याला जादा पाणी; कोल्हापुरात काही माजी नगरसेवकांनी स्वत:ची उभी केली यंत्रणा

googlenewsNext

भारत चव्हाण 

कोल्हापूर : शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याकरिता जशी जलवाहिनीवरील गळती कारणीभूत आहे, तसा माजी नगरसेवकांचा वितरण व्यवस्थेतील कमालीचा हस्तक्षेप देखील कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. काही नगरसेवकांनी पाणी वितरणाची स्वत:चीच यंत्रणा उभी केली असून केवळ आपल्या प्रभागाला जास्तीत जास्त पाणी पुरवठा कसा होईल याकडेच त्यांनी अधिक लक्ष दिले आहे. साहजिकच दुसऱ्या भागाला अपुऱ्या दाबाच्या पाणीपुरवठ्याचा अन्याय सहन करावा लागत आहे.

कोल्हापूर शहराला वळसा घालून जाणारी पंचगंगा नदी बारा महिने वाहत आहे. कितीही कडक उन्हाळा पडला तरी पंचगंगा काठोकाठ भरलेली असते. छत्रपती शाहू महाराज यांच्या कृपेने झालेले राधानगरी धरण आणि नंतरच्या काळात झालेल्या काळम्मावाडी, तुळशी यासारख्या अन्य छोट्या छोट्या धरणांमुळे कोल्हापूरला पाण्याचा दुष्काळ कधीच जाणवला नाही. मात्र, पाणी वितरण व्यवस्थेत मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ आहे. जुन्या जलवाहिन्यांमुळे गळती मोठी असल्याने आतापर्यंत अपुऱ्या, कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे खापर गळतीवर फोडले गेले. परंतु त्याही पेक्षा अधिक गलथानपणा वितरण व्यवस्थेत असल्याचे दिसून येते.

मी आणि माझा मतदार संघ एवढ्या संकुचित वृत्तीने काम करणाऱ्या काही माजी नगरसेवकांनी शहरातील पाणी वितरण व्यवस्था आपल्या मर्जीप्रमाणे राबविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मतदारांना पाणी पुरवठा मुबलक व्हावा याकरिता त्यांनी स्वत:ची यंत्रणा राबविल्याचे चित्र समोर येत आहे. प्रभागात कोठे कोठे व्हॉल्व्ह आहेत, पाणी किती वाजता येते आणि बंद होते याची त्यांनी माहिती करून घेतली आहे. किती आठ्ठ्या सोडल्या की जास्त दाबाने पाणी येते याचीही त्यांना माहिती आहे. एवढेच काय तर व्हॉल्व्ह सोडबंद करणारे पाणेसुद्धा त्यांनी खरेदी केले आहेत. हे पाणे घेऊनच काही माजी नगरसेवकांचे पगारी नोकर, कार्यकर्ते पाणी सोडबंद करतात.

पाच ते सहा माजी नगरसेवकांनी अशी स्वत:ची यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे महापालिकेचे चावीवाले काहीच करू शकलेले नाहीत. आपण स्वत: व्हॉल्व्ह सोडबंद करावेत, तक्रार करावी म्हटली तर शिव्याशाप, उद्धार ठरलेलाच असतो. त्यामुळे या माजी नगरसेवकांच्या वितरण व्यवस्थेतील हस्तक्षेपाला कोणीही पायबंद घालू शकलेले नाही. म्हणूनच दुसऱ्या भागात नागरिकांना पिण्याचे पाणी अपुरे, कमी दाबाने मिळत आहे. या नागरिकांना मात्र कायम कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

सिमेंट घालून बंद केलेत व्हॉल्व्ह

शहराच्या एका प्रभागात तर पाण्याचे व्हॉल्व्ह कायमचे सोडलेले आहेत. सोडलेले व्हॉल्व्ह सिमेंट घालून बंद केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भागातील पाणी बंद होण्याचा प्रश्नच येत नाही. टाकीतून सोडलेले पाणी थेट घराघरात पोहोचते. याची माहिती असूनही पालिकेच्या चावीवाल्यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Web Title: Some former councilors set up their own system, Water supply disrupted in some parts of Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.