कोल्हापुरात सुबोध भावेंच्या चित्रपटाचे बंदोबस्तात चित्रिकरण, चित्रिकरण बंद पाडण्याचा शिवभक्तांनी दिला होता इशारा
By संदीप आडनाईक | Published: December 18, 2022 11:52 PM2022-12-18T23:52:11+5:302022-12-19T00:01:31+5:30
हर हर महादेव चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे सुबोध भावे सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले आठ दिवस कोल्हापूरमध्ये आहेत. याची माहिती मिळताच शिवभक्त ते रहात असलेल्या हॉटेलवर पोहोचले आणि त्यांनी आपला आक्षेप नोंदविला.
कोल्हापूर : वादग्रस्त दृश्यांमुळे चर्चेत आलेल्या हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणारे अभिनेते सुबोध भावे यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रिकरण रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली या गावात पोलिस बंदोबस्तात सुरु ठेवण्यात आले. शिवभक्तांनी शनिवारी भावे यांची भेट घेउन या चित्रपटाबद्दल आक्षेप नोंदवत माफी मागितली नाही, तर चित्रिकरण बंद पाडण्याचा इशारा दिला होता.
हर हर महादेव चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे सुबोध भावे सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले आठ दिवस कोल्हापूरमध्ये आहेत. याची माहिती मिळताच शिवभक्त ते रहात असलेल्या हॉटेलवर पोहोचले आणि त्यांनी आपला आक्षेप नोंदविला. त्यांच्यासोबतच्या भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत असताना इतिहासाची झालेली मोडतोड, लढाई असेल अफजलखानाचा वध असेल, बलात्काराचे दृश्य, बाजीप्रभूंनी छत्रपती शिवरायांचा केलेला एकेरी उल्लेख याविषयीचे सर्व आक्षेप याबाबत चर्चा केली आणि त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
सुबोध भावे यांनी या चित्रपटामध्ये मी फक्त एक कलाकार म्हणून काम केले आहे, दिग्दर्शक, लेखक यांच्याशी आपला संबंध नाही, तसेच मी या चित्रपटाबद्दल काही बोलू शकत नाही. मात्र, इथून पुढे कोणताही बायोपिक किंवा ऐतिहासिक पात्र याची भूमिका मी करणार नाही असे त्यांनी हात जोडून सांगितले.
दरम्यान, या चित्रपटाबद्दल आक्षेप नोंदवत असताना शिवभक्तांनी निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक देशपांडे यांच्याशी संपर्क करून शिवभक्तांच्या भावना पोहोचवण्यास सांगितले. दोन दिवसात जर दिग्दर्शकाकडून या चित्रपटाबद्दल माफीनामा आला नाही तर सुबोध भावे यांचे सुरु असलेले चित्रिकरण बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला होता. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे, अमित अडसुळे, संजय पवार, युवराज उलपे, प्रदीप हांडे , कृष्णा जगताप आदी उपस्थित होते.