इचलकरंजीतील पूरग्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:28+5:302021-07-27T04:25:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीची पाणी पातळीत किंचित घट झाली आहे. सोमवारी दिवसभरात चार इंचाने पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीची पाणी पातळीत किंचित घट झाली आहे. सोमवारी दिवसभरात चार इंचाने पाणी उतरले असून, पातळी ७८ फुटांवर स्थिर आहे. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महापुरामुळे सुमारे २० हजार नागरिकांनी स्थलांतर केले आहे.
शहरात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पंचगंगेचे पाणी ओसरू लागले आहे. रविवारी (दि.२५) सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी ७८ फूट ४ इंचावर पोहचली होती. सोमवार सकाळपासून पाणी पातळीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता पाणी पातळी ४ इंचाने कमी होऊन ७८ फूट इतकी झाली. संथ गतीने पाणी ओसरत असले तरीही पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बाब आहे.
दरम्यान, नदीवेस, गावभाग व मळे भागातील सुमारे २० हजार नागरिक स्थलांतरित झाले असून त्यापैकी सुमारे साडेचार हजार नागरिकांनी पालिकेच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. जनावरांसाठीही छावण्यांची सोय करण्यात आली असून त्यामध्ये ५०० हून अधिक जनावरांची सोय केली आहे.