सोमवार पेठेत तरुणावर खुनी हल्ला
By admin | Published: September 15, 2015 01:07 AM2015-09-15T01:07:58+5:302015-09-15T01:07:58+5:30
खर्चाला पैसे न दिल्याचे कारण : मुख्य सूत्रधारास अटक, तिघे पसार
कोल्हापूर : सोमवार पेठ येथील देशभूषण हायस्कूलसमोर सोमवारी सकाळी खर्चासाठी पैसे मागूनसुद्धा देत नाही या रागातून चौघा तरुणांनी तरुणास बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली. त्यामध्ये सद्दामहुसेन मुस्ताकअहमद मुजावर (वय १९, रा. सोमवार पेठ) हा गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित आरोपी विशाल अनिल साळोखे (२१, रा. घिसाड गल्ली) याला अटक केली. त्याचे अन्य तिघे साथीदार पसार असून, त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आल्याचे समजते.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सद्दामहुसेन मुजावर हा विवेकानंद कॉलेजमध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकतो. दोन दिवसांपूर्वी विशाल साळोखे व त्याच्या मित्रांबरोबर त्याचा वाद झाला होता. यावरून साळोखेने त्याला फोनवरून धमकी दिली होती. त्यानंतर दोन्ही बाजूने मध्यस्थीने वाद मिटविला होता.
दरम्यान, सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुजावर महाराणा प्रताप चौक येथून घिसाड गल्ली मार्गे घरी निघाला होता. देशभूषण हायस्कूलसमोर तो येताच सिद्धांत सूर्यवंशी याने त्याला हाक मारून बोलावून घेतले. त्याला आम्ही वारंवार तुझ्याकडे खर्चासाठी पैसे मागूनसुद्धा तू देत नाहीस, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या विशाल साळोखे, विजय पवार व रोहन सूर्यवंशी आदींनी त्याला मारहाण केली. यावेळी साळोखेने त्याच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली. तोपर्यंत सिद्धांत सूर्यवंशी तलवार घेऊन आला. यावेळी हर्षद मोमीन, मुराद मुजावर, सैफ सिराज शेख, आदींनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.