दुभाजकाला धडकून सराफाचा मुलगा ठार
By admin | Published: May 16, 2017 06:33 PM2017-05-16T18:33:06+5:302017-05-16T18:33:06+5:30
मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतताना दुर्घटना : ताराबाई पार्कातील घटना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : वाढती रहदारी, भरधाव वाहने, खराब व अरूंद रस्ते, वाहतूक नियम पालनाचा अभाव या सर्व समस्यांमुळे कोल्हापूर शहरात अपघातांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. महाविद्यालयीन तरुण ‘धूम स्टाईल’ने वाहने वेगात चालवत मृत्यूला आमंत्रण देत आहेत. ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉल चौक ते आदित्य कॉर्नर रोडवरील दुभाजकाला दुचाकी धडकून कोल्हापुरातील प्रसिद्ध सराफ व्यापारी अभय नारायण पोतदार यांचा धाकटा मुलगा अभिनंदन (वय २१, रा. गंगावेश) हा जागीच ठार झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अधिक माहिती अशी, अभिनंदन पोतदार हा भारती विद्यापीठात बी.सी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास मित्राच्या वाढदिवस पार्टीसाठी तो ताराबाई पार्क येथील प्रथम शेट्टी याच्या घरी गेला होता. याठिकाणी रात्रभर मित्रांसोबत पार्टी साजरी केली. त्यानंतर मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास आपल्या हायफाय दुचाकीवरून तो घरी येण्यासाठी निघाला. धैर्यप्रसाद हॉल चौकाकडून आदित्य कॉर्नरकडे भरधाव वगाने येत असताना दुचाकीवरील ताबा सुटून ती रस्ता दुभाजकाला धडकली. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटे फिरायला येणाऱ्या नागरिकांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात अभिनंदनचा मृतदेह पडला होता तर शेजारी दुचाकी पडली होती.
पोलिसांनी त्याच्या अपघाताची माहिती नातेवाईकांना देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर शवागृहात आणला. वाढदिवसानिमित्त रात्रभर एकत्र सहवासात राहून गळाभेट घेतलेल्या अभिनंदनचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच मित्रांना धक्काच बसला. त्यांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
नेत्रदानाला कुटुंबियांची साथ
अपघात झाल्याचे कळाल्यानंतर एखादे कुटुंबिय हबकून जाते. अभिनंदनचा मृतदेह सीपीआरच्या शवागृहात आणला. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबियांना नेत्रदान करणार आहात काय, अशी विचारणा केली. त्यावर कुटुंबियांनी धीरोदात्तपणे निर्णय घेत मुलाचे नेत्रदान करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर डॉक्टरांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. तरुणांची ‘धूम स्टाईल’ शहराच्या चारी बाजूंनी दुपदरी (एकेरी मार्ग) रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर ये-जा करणारे प्रत्येक वाहन ६० ते ८० च्या वेगात जात असल्याने नेहमी एक-दोन अपघात घडतात. वाहनांची रहदारी वाढल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. महाविद्यालयीन तरुण ‘धूम स्टाईल’ने बेशिस्तपणे वाहने चालविताना दिसतात. त्यांना वेळीच रोखण्यासाठी पालक किंवा पोलीस प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयीन तरुणांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
सदोष अपघातस्थळे
तावडे हॉटेल, मार्केट यार्ड, कावळा नाका, धैर्यप्रसाद हॉल चौक, टेंबलाई उड्डाणपूल, मिलीटरी कॅम्प परिसर, शिवाजी विद्यापीठ रोड, सायबर चौक, एन. सी. सी. भवन, ध्यानचंद हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक, कळंबा नाका, देवकर पाणंद चौक, क्रशर चौक, जुना वाशी नाका, फुलेवाडी नाका, शिवाजी पूल, कसबा बावडा ही सर्व ठिकाणी ‘सदोष अपघातस्थळे’ म्हणून घोषित केली आहेत.
वेगाला मर्यादा नाही
शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनधारकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक व्यवस्था म्हणजे शहरातील मोठी समस्या आहे. शहर वाहतूक पोलिसांच्या समोरून महाविद्यालयीन तरुण वाहने सुसाट वेगाने चालवत असतात. काहीवेळा ट्रिप्पल सीटवरून बिनदिक्कतपणे फिरत असतात. हे चित्र नजरेसमोर असतानाही ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. शहरातील प्रत्येक वाहनाला वेगमर्यादा घालून दिली पाहिजे. मात्र, वाहतूक पोलीस त्याबद्दल कोणतीच खबरदारी घेत नाहीत.