‘जी २०’ परिषद: कोल्हापूरच्या सुपुत्राला राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 01:02 PM2023-09-12T13:02:05+5:302023-09-12T13:02:27+5:30

कोल्हापूर : नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जी २०’ परिषदेसाठी येणाऱ्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याचा मान कोल्हापूरचे सुपुत्र आणि ...

Son of Kolhapur and Air Commodore Abhay Parandekar of the Indian Air Force had the honor of welcoming the heads of state from around the world for the 'G20' summit | ‘जी २०’ परिषद: कोल्हापूरच्या सुपुत्राला राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताचा मान

‘जी २०’ परिषद: कोल्हापूरच्या सुपुत्राला राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताचा मान

googlenewsNext

कोल्हापूर : नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जी २०’ परिषदेसाठी येणाऱ्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याचा मान कोल्हापूरचे सुपुत्र आणि भारतीय वायुदलातील एअर कमाडोर अभय परांडेकर यांना मिळाला आहे.

मूळचे शुक्रवार पेठेतील रहिवासी असलेले परांडेकर हे विद्यापीठ हायस्कूलमधून १९८८ साली दहावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९९५ साली ते वायुदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून दाखल झाले. युद्धादरम्यान हवेतल्या हवेत विमानामध्ये इंधन भरण्याची महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून ते दिल्लीतील पालम विमानतळावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विमान उड्डाणाची जबाबदारी सांभाळत आहेत.

परांडेकर यांच्यावर राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताची जबाबदारी देण्यात आली. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून रविवारी रात्री हे राष्ट्राध्यक्ष परत जाईपर्यंत त्यांचे स्वागत आणि निरोपही देण्याची जबाबदारी परांडेकर यांनी उत्तम पद्धतीने पार पाडली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक यांच्यासह अर्जेंटिना, फ्रान्स, सौदी अरेबिया, इटली, ब्राझील यांच्यासह २० राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत परांडेकर यांनी केले. विमानतळावर राष्ट्राध्यक्ष उतरल्यानंतर त्यांचे पहिले स्वागत परांडेकर यांच्याकडून केले जात होते. त्यांचे फोटो कोल्हापूरमधील समाजमाध्यमावर शेअर करण्यात आले आहेत.

अनेक वर्षे वायुदलात काम करत असताना अशा पद्धतीने राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्यासाठी संधी मिळेल असे वाटले नव्हते. परंतु ती अविस्मरणीय संधी मिळाली आणि कोल्हापूरकर असल्याचाही अभिमान वाटला, अशी प्रतिक्रिया परांडेकर यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Son of Kolhapur and Air Commodore Abhay Parandekar of the Indian Air Force had the honor of welcoming the heads of state from around the world for the 'G20' summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.