कोल्हापूरचा सुपुत्र विनायक हेगाणा ब्रिटीश सरकारचा विशेष सल्लागार
By संदीप आडनाईक | Published: February 7, 2024 07:35 PM2024-02-07T19:35:21+5:302024-02-07T19:36:16+5:30
मानसिक आरोग्यावर धोरणात्मक निर्मितीसाठी देणार योगदान.
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड गावचा सुपुत्र, कृषी पदवीधर युवा संशोधक विनायक हेगाणा याची युनायटेड किंग्डम ब्रिटीश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.
स्वान्सी विद्यापीठाचे संचालक संशोधक डॉ. इमा फारसन या सल्लागार गटाचे नेतृत्व करत आहेत. या सल्लागार मंडळाच्या माध्यमातून विनायक हे विशेष प्रतिनिधी म्हणून समन्वय साधतील. या जबाबदारीवर काम करणारे ते देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक आहेत. काही महिन्यांपूर्वीच ब्रिटिश सरकारचा प्रतिष्ठेचा चेव्हनिग ग्लोबल लीडर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
नामांकित जागतिक विद्यापीठामध्ये संशोधन अभ्यास करत असताना युनायटेड किंग्डममधील शेतकरी आणि ग्रामीण भागातील अभ्यासातून विविध प्रकारची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या संशोधन कामाची दखल घेऊन युनायटेड किंग्डममधील ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी धोरण निर्मिती व सल्ला या कामाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. हेगाणा गत ९ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातून पदवीधर शिक्षण घेवून मराठवाड्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात अविरतपणे काम करत आहेत.