‘आर्या’च्या उत्सुकतेपोटी सोनाक्षी सुखरूप घरी!
By admin | Published: November 5, 2016 11:21 PM2016-11-05T23:21:14+5:302016-11-06T00:38:15+5:30
वाईतील घटना : मुलगी गुप्ता कुटुंबीयांच्या स्वाधीन
संजीव वरे -- पसरणी -अडीच वर्षांची सोनाक्षी गुप्ता ही मुलगी चार दिवसांपूर्वी खेळता-खेळता घरापासून लांब गेली. तिला बोलता येत नसल्याने काहीच कळेना.. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याने तिला वाई पोलिस ठाण्यात नेऊन दिले. तिला ओळखणाऱ्या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या आर्या मांढरे हिच्या उत्सुकतेपोटी तिच्या घरचा शोध लागून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपली मुलगी सुखरूप मिळाल्याने गुप्ता कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
मूळचे उत्तरप्रदेश येथील असणारे गोविंद आणि रिंकी गुप्ता गेल्या सहा वर्षांपासून सिद्धनाथवाडी वाई येथे वास्तव्यास आहेत. गोविंद गुप्ता हे तयार कपडे गावोगावी जाऊन विकतात. घरी पत्नी रिंकी गुप्ता, आठ वर्षांची मोठी मुलगी साक्षी तर अडीच वर्षांची सोनाक्षी असा त्यांचा परिवार आहे. सोनाक्षी ही आईची नजर चुकवून खेळता-खेळता वाईच्या बसस्थानक परिसरात पोहोचली. तिला चांगले बोलता ही येत नसल्यामुळे घरचा पत्ता सांगता येत नसल्याने ती रडत रस्त्यावरून ये-जा करणारे लोक पाहत होती. त्यातील एका पादचाऱ्याने तिला त्याच अवस्थेत वाई पोलिसांच्या ताब्यात दिले. कामानिमित्त पोलिस ठाण्यामध्ये येणाऱ्या लोकांना त्या मुलीबाबत विचारपूस करत होते. त्यावेळी सिद्धनाथवाडी येथील नीलेश मांढरे हे काही कामानिमित्त पोलिस ठाण्यात गेले.
त्यावेळी पोलिसांनी ही मुलगी सापडली आहे. तिला ओळखता का? म्हणून विचारले असता ते नाही म्हणाले. त्यानंतर ते आपल्या गाडीवरून येताना त्यांची मुलगी आर्याला शाळेतून आणण्यासाठी गेले. येताना ते आर्याला सांगत होते की, बाहेर कोठे जास्त लांब जायचे नाही, मुले चुकतात! आताच एक मुलगी पोलिस ठाण्यात पाहिली, असे सांगताच आर्याने ‘त्या मुलीला पाहायचे आहे, मला घेऊन चला,’ असा हट्ट धरला.
अखेर दिवाळी गोड..
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. लहान मुलांच्या या आवडत्या सणात आपली मुलगी खेळता-खेळता खूपच लांब गेली याची माहिती तिच्या आईला नव्हती. ती घरकामातच व्यस्त होती. आर्या मांढरे हिने आपल्या वडिलांकडे हट्ट धरला की पोलिस ठाण्यात कोणती मुलगी आहे ती मला पाहावयाची आहे. शेवटी वडिलांचा नाईलाज झाला ते शाळेतून आपल्या दुचाकीवर थेट पोलिस ठाण्यात घेऊन निघाले. तिला पाहिल्यावर तिचे घर माहिती आहे म्हणून वडिलांना सांगितले. यावरून गुप्ता कुटुंबीयांची मुलगी त्यांना सुखरूप मिळाली.