सोनाळीत ग्रामस्थांची पोलिसांवर दगडफेक, वरद पाटील खुनातील संशयिताचे कुटुंबीय गावात आल्याने राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:00 PM2022-03-23T12:00:51+5:302022-03-23T12:01:16+5:30
१८ ऑगस्ट २०२१ ला सोनाळी येथील आठ वर्षीय वरद पाटील यांचे अपहरण करून सावर्डे बुद्रुक येथे त्याचा अमानुष खून केला होता. या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी सोनाळी येथील मारुती वैद्य याला अटक केली होती.
मुरगूड : सोनाळी (ता.कागल) येथील वरद रवींद्र पाटील या बालकाच्या खून प्रकरणातून ग्रामस्थांचा उद्रेक झाला. या गुन्ह्यातील आरोपीचे नातेवाईक गावात आल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. संशयित आरोपींच्या नातेवाईकांना गावाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यात तीन पोलीस अधिकाऱ्यांसह पाच पोलीस आणि ग्रामस्थ असे दहा जण जखमी झाले. काल, मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
गावात तणावपूर्ण वातावरण असून सदर कुटुंबीयांना गावातून बाहेर काढा या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, १८ ऑगस्ट २०२१ ला सोनाळी येथील आठ वर्षीय वरद पाटील यांचे अपहरण करून सावर्डे बुद्रुक येथे त्याचा अमानुष खून केला होता. या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी सोनाळी येथील मारुती वैद्य याला अटक केली होती. याप्रकरणी अजून पोलीस तपास सुरू आहे. गावाने एकमुखी निर्णय घेऊन सदर संशयित आरोपी वैद्य याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला होता व त्यांना गाव बंदी केली होती.
गेले काही दिवस वैद्य कुटुंबीय गावात येण्याचा प्रयत्न करत आहेत; पण ग्रामस्थांचा याला विरोध होता. शिवाय पोलिसांनी या कुटुंबाला गावात येण्यासाठी कोणतीही मदत करू नये अशी मागणी ही केली होती; पण याला झुगारून हे वैद्य कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी सोनाळी गावात राहण्यास आले आहे. ही माहिती पोलिसांना मिळताच दोन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त याठिकाणी तैनात होता. सोमवारी गावातील शिष्टमंडळाने मुरगूड पोलिसांची भेट घेऊन त्या वैद्य कुटुंबाला गावातून जाण्यास प्रवृत्त करावे अशी मागणी केली; पण पोलिसांनी आपण त्यांना आणले नाही त्यांना जावा म्हणून सांगू शकत नाही अशी भूमिका घेतली.
मंगळवारी या निषेधार्थ गावात मोर्चा काढला होता. सायंकाळी हा मोर्चा निघणार होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त तैनात केला होता. हा मोर्चा वैद्य कुटुंबीयांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थ व पोलिसांत वादावादी होत धक्काबुक्की सुरू झाली. त्यातून दगडफेकीलाही सुरुवात झाली.
रात्री उशिरा अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी हे घटनास्थळी दाखल झालेत. ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम असून ठिय्या मांडून बसले आहेत. गावातील वातावरण तणावपूर्ण असून उशिरापर्यंत या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. संतप्त ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता.
जखमींमध्ये तीन पोलीस अधिकारी
जखमींमध्ये मुरगूड पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहा. पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे, पीएसआय मोनिका खडके हे पोलीस अधिकारी जखमी झालेत. तर सारिका कृष्णात पाटील, दत्तात्रय रामचंद्र पाटील, प्रवीण दत्तात्रय पाटील, ज्ञानदेव संभाजी पाटील हे ग्रामस्थ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना कोल्हापूर येथील सरकारी तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.