संशयित आरोपीच्या घरावर सोनाळीकरांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:15+5:302021-08-24T04:29:15+5:30
मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील निष्पाप वरद पाटील या बालकाच्या खूनप्रकरणी अटकेत असणाऱ्या मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याच्या ...
मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील निष्पाप वरद पाटील या बालकाच्या खूनप्रकरणी अटकेत असणाऱ्या मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याच्या संपूर्ण कुटुंबीयांवर सोनाळीकरांनी बहिष्कार टाकला आहे. यातून आज वैद्य याच्या घरातील पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन ग्रामपंचायत प्रशासनाने तोडले आहे. या कुटुंबाला कोणी कसलीच मदत करायची नाही, असा निर्णय सोमवारी ग्रामस्थांनी घेतला.
सोनाळी सावर्डे बु. येथील सुमारे दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल व तणावपूर्ण वातावरणात रक्षा विसर्जन विधी करण्यात आला. या ठिकाणी झालेल्या शोकसभेत अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
वरद पाटीलचे दि.१७ रोजी दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने अपहरण करून अमानुषपणे त्याचा खून केला. गेले पाच दिवस सोनाळी व आजोळ सावर्डे बु. येथे मारुती वैद्यविरुद्ध तीव्र संतापाची लाट पसरली होती. या गुन्ह्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेऊन तपासासाठी विशेष पथक नेमले आहे.
सोमवारी रक्षा विसर्जन विधी झाल्यानंतर स्मशानभूमीत शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी सत्यजित पाटील, पी .व्ही पाटील, संभाजी कुलकर्णी, साताप्पा कांबळे, सुदाम कांबळे, राहुल पाटील आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या सभेत वैद्य कुटुंबीयाला गावातील कोणीही कसलीच मदत करायची नाही, जर कोणी केली तर त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. डीवायएसपी आर. आर. पाटील, सपोनि विकास बडवे, पीएसआय कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुक्या जनावरांना दिले पाहुण्यांच्या ताब्यात
वरद खूनप्रकरणी अटक केलेला आरोपी मारुती वैद्य याचे कुटुंबीय घटना उघडकीस आल्यापासून गाव सोडून गेले आहे. वैद्य याच्या घरात दहा ते पंधरा जनावरे आहेत. त्याच्या वैरणीचा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गावाने या कुटुंबाला कोणतीच मदत करायची नाही असे ठरविल्याने जनावरांना कोणीही चारा टाकण्यासाठी गेले नाही. सोमवारी गावातील प्रमुखांनी शेवटी मुक्या जनावरांचा यात काय दोष म्हणून ती सर्व जनावरे वैद्य याच्या पाहुण्याकडे पोहोचविली.
पोलिसांनी केले आवाहन
वरदच्या खुनाचा नि:पक्षपातीपणे तपास करण्याचा प्रयत्न पोलीस खाते करीत आहे. यासाठी दहा विशेष पथकांतून पन्नास अधिकारी, कर्मचारी वेगवेगळ्या मुद्यावर माहिती संकलित करीत आहेत. सोमवारी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये परिसरातील सर्व गावांतील सरपंचांची बैठक पार पडली. यामध्ये सपोनि विकास बडवे यांनी सर्व गावामध्ये शांतता ठेवावी, शक्यतो असे मोर्चे आंदोलन करू नये, असे आवाहन केले.
तपासाची आगळीवेगळी पद्धत
वातावरण तणावपूर्ण बनल्याने आणि वरदच्या कुटुंबींयांना तपासासाठी पोलीस वारंवार बोलावीत असल्याचा आरोप काहींनी केल्याने पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून सोनाळी हे गाव तपासाचे केंद्र बनविले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. शिवाय सोनाळी आणि सावर्डे बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात तपास वहीच ठेवली आहे. जर कोणत्याही ग्रामस्थास पोलिसांसमोर येऊन बोलण्यास अडचण वाटत असेल तर त्यांनी आपली माहिती या वहीत लिहावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पोलिसांनी तपासकार्य सुरू ठेवल्याने तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदत होत आहे.