सोनाराला कारागिराचा साडेतीन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:35+5:302021-02-11T04:27:35+5:30
कोल्हापूर : दागिने बनविण्यासाठी दिलेले चोख सोने व रोकड असा सुमारे तीन लाख ६४ हजार रुपयांचा सोनाराला गंडा घालून ...
कोल्हापूर : दागिने बनविण्यासाठी दिलेले चोख सोने व रोकड असा सुमारे तीन लाख ६४ हजार रुपयांचा सोनाराला गंडा घालून दोघे परप्रांतीय कारागीर बेपत्ता झाल्याची घटना घडली. याबाबत सोनार अजित ऊर्फ सनी रघुनाथ आंबले (रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी दोघा कारागिरांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे : नूरहोसेन अन्सार शेख (वय २१), इमाम अन्सार शेख (३०, दोघेही रा. वांगी बोळ, कोल्हापूर, मूळ रा. नोलकेस्टपूर, जि. हुगली, कोलकाता, रा. प. बंगाल).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजित आंबले यांचे जोतिबा मंदिरशेजारी कणकेश्वर कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर सोनार व्यवसायाचे दुकान आहे. त्यांच्याकडून चोख सोने घेऊन कारागीर दागिने बनवून देतात. दि. ६ डिसेंबर २०२० ते दि. ३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आंबले यांनी परप्रांतीय दोघा कारागिरांना दोन लाख ९२ हजार रुपय किमतीचे ५८.५१० ग्रॅम चोख सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. तसेच त्यांना यापूर्वी वेळोवेळी गावी जाण्यासाठी व घरखर्चासाठी ७२ हजार रुपये दिले होते; पण कारागीर शेख बंधूंनी दागिने बनवून न देता पोबारा केल्याचे दिसून आले. त्यामुळे आंबले यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्या दोघा कारागिरांविरुद्ध तक्रार दिली आहे.