सोनोग्राफी मशीनच्या सॉफ्टवेअरची सीडी रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:16+5:302021-08-13T04:28:16+5:30
: डॉ. काटकर दाम्पत्याची कसून चौकशी इचलकरंजी : गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी अटक केलेल्या डॉ. भाऊसाहेब काटकर याच्यासह त्याची पत्नी ...
: डॉ. काटकर दाम्पत्याची कसून चौकशी
इचलकरंजी : गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी अटक केलेल्या डॉ. भाऊसाहेब काटकर याच्यासह त्याची पत्नी वैशाली या दोघांची गुरुवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली, तसेच नर्सिंग अॅक्टच्या परवान्याची मुदत संपली आहे. सोनोग्राफी मशीनकरिता आवश्यक असलेली सॉफ्टवेअरची सीडी रिकामी आढळली आहे. पार्वती मुराळे (रा. लंगोटे मळा) या वृद्धेची चौकशी सुरू आहे.
काटकर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकून डॉ. काटकर याला रंगेहात पकडले होते. यामध्ये ग्राहक शोधणे, पोहोचवणे याचे रॅकेट आहे का, अशी तपासणी सुरू आहे. पार्वती या वृद्धेच्या माध्यमातून पथक रुग्णालयापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणात रिक्षाचालकाचा संबंध असल्याने एका रिक्षाचालकाकडेही तपास सुरू आहे; परंतु पार्वतीला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाचा अद्याप शोध लागलेला नाही.
जिल्हा शल्यचिकित्सक विलास देशमुख, गर्भलिंग निदान पथकाच्या अॅड. गौरी पाटील, आयजीएमचे रवीकुमार शेट्ये यांचे पथक दिवसभर ठाण मांडून होते. ताब्यात घेतलेली कागदपत्रे व रेकॉर्ड तपासणीचे काम सुरू आहे. गर्भपाताच्या अनुषंगाने लागणारी कागदपत्रे रुग्णालयात आढळली नाहीत; परंतु गर्भपातासाठी लागणारी अवजारे आढळली आहेत, तसेच संबंधितांचे जबाबही नोंदविण्यात येत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणखी माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. नर्सिंग अॅक्टच्या परवान्याची मुदत संपल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.