गरोदर माता, भगिनींनी तुमचं काय घोडं मारलंय?, कोल्हापुरात शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 04:30 PM2022-12-03T16:30:22+5:302022-12-03T16:30:42+5:30

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काल, शुक्रवारी (दि.२) विषय काढल्यानंतर आता याची चर्चा सुरू झाली आहे

Sonography machines in Kolhapur government hospital closed | गरोदर माता, भगिनींनी तुमचं काय घोडं मारलंय?, कोल्हापुरात शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन्स बंद

गरोदर माता, भगिनींनी तुमचं काय घोडं मारलंय?, कोल्हापुरात शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन्स बंद

googlenewsNext

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील आठपैकी सहा ठिकाणची सोनोग्राफी मशिन्स बंद आहेत. यातील तीन ठिकाणी मशिन्सच बंद आहेत तर तीन ठिकाणी रेडिओलॉजिस्ट नाहीत म्हणून सुरू असलेली मशिन्स चालवायला कोणी नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काल, शुक्रवारी (दि.२) विषय काढल्यानंतर आता याची चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील गरोदर माता, भगिनींनी तुमचे काय घोडे मारले आहे काय ? अशी विचारणा होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील इंदिरा गांधी रुग्णालय इचलकरंजी आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील दोनच सोनोग्राफी मशिन्स सध्या सुरू आहेत. हातकणंगले, दत्तवाड, ता. शिरोळ आणि नेसरी, ता. गडहिंग्लज येथील तिन्ही मशिन्स बंद आहेत. येथील मशिन्स खूप जुनी असल्याचे सांगण्यात येते. मशिन्स जुनी आहेत, हे कळल्यानंतर तेथे नव्या मशिन्स बसवण्याबाबत का हालचाली झालेल्या नाहीत?

दुसरीकडे सेवा रुग्णालय कसबा बावडा, कोडोली ता. पन्हाळा आणि गारगोटी रुग्णालयातील मशिन्स वापरण्यासाठी रेडिओलॉजिस्ट नाहीत म्हणून ती बंद आहेत. कंत्राटी रेडिओलॉजिस्ट त्यांची मुदत संपल्यानंतर जाणार आहेत, हे माहिती असताना मग त्यांना संलग्नता का दिली नाही? नवीन जाहिरातींना प्रतिसाद नसेल तर पगार वाढवून देण्याचा निर्णय का घेतला नाही? महाविकास आघाडी सरकारमध्ये तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे आरोग्य राज्यमंत्री होते. त्यांच्यापर्यंत हा विषय कोणत्या अधिकाऱ्यांनी नेला होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

एका मशीनची किंमत किमान साडेचार लाख ते पाच लाख रुपये आहे. यातील काही मशिन्स बसवून दहा वर्षे तर काही मशिन्स बसवून तीन, चार वर्षे झाली आहेत. या सगळ्यामुळे सहा ते सात तालुक्यांतील गरोदर माता, भगिनींना प्रत्येकवेळी ७०० ते ८०० रुपये खर्च करून खासगीमध्ये सोनोग्राफी करून घ्यावी लागते. तिसऱ्या, सहाव्या आणि नवव्या महिन्यात शक्यतो सोनोग्राफी केली जाते. अशावेळी शासनाची मशिन्स बंद आणि खासगीमध्ये फेऱ्या मारायची वेळ या सर्वांवर आली आहे.

Web Title: Sonography machines in Kolhapur government hospital closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.