लवकरच ११ शासकीय दंत महाविद्यालये
By admin | Published: January 22, 2017 12:43 AM2017-01-22T00:43:14+5:302017-01-22T00:43:14+5:30
प्रस्ताव पाठविण्याचे आदेश : शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश
गणेश शिंदे --कोल्हापूर -राज्यात १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, नागपूर, औरंगाबाद या तीन ठिकाणीच सध्या दंतवैद्यकीय शासकीय महाविद्यालये आहेत. या तीन शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयांतून वर्षाला १८० विद्यार्थी दंत शस्त्रक्रिया पदवी (बीडीएस) घेऊन बाहेर पडतात. लोकसंख्येच्या मानाने सध्या ही संख्या अपुरी आहे; पण भविष्याचा विचार करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना दंत महाविद्यालयाचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या वारणानगर येथे केवळ एकच खासगी दंतवैद्यकीय महाविद्यालय आहे. या ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णांना या शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयाचा फायदा मिळणार आहे. दरम्यान, २००२ ला तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नांतून शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
भारतीय दंत परिषदेच्या नवीन मानांकनानुसार नवीन दंत महाविद्यालयास परवानगी ही संलग्नित वैद्यकीय महाविद्यालय असल्यानंतरच मिळणार आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देऊन प्रत्येक महाविद्यालयासाठी नोडल आॅफिसर नेमण्यात आले आहेत. याचा आढावा संबंधित नोडल आॅफिसरकडे वैद्यकीय महाविद्यालयाने द्यावयाचा आहे. दरम्यान, याबाबत मुंबईत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे व अतिरिक्त मुख्य सचिव मेघा गाडगीळ यांच्या उपस्थितीत ११ वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांची बैठक झाली. या बैठकीत हे लेखी आदेश देण्यात आले.
दृष्टिक्षेपात...
शासकीय दंत महाविद्यालय
जिल्हाक्षमता
मुंबई१००
नागपूर४०
औरंगाबाद४०
कोल्हापुरातील शासकीय दंत महाविद्यालयात स्थानिक मुला-मुलींना प्रवेश मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. तसेच रुग्णांवर नाममात्र दरात उपचार होतील. हा निर्णय कोल्हापूरकरांना उपयुक्त ठरणार आहे.
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.
बुधवारी (दि. २५) शेंडा पार्कची पाहणी
कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे दंत महाविद्यालय शेंडा पार्क येथील महाविद्यालयाच्या जागेत होणार आहे. यासाठी ‘सीपीआर’च्या दंत विभागप्रमुख डॉ. लता खोब्रागडे प्रस्ताव बनवीत आहेत.
मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालयाचे दंतविकृती व अणुजीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. जगदीश तुपकरी हे बुधवारी (दि. २५) कोल्हापुरात येणार आहेत. ते जागेची पाहणी करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.