‘थम्ब’ करताच रेशन दुकानदाराच्या खात्यावर पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:26 PM2018-07-08T23:26:26+5:302018-07-08T23:26:35+5:30
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : धान्य खरेदीनंतर ग्राहकाने ‘थम्ब इंप्रेशन’ (अंगठ्याचा ठसा) करताच त्याच्या बॅँक खात्यातील पैसे रेशन दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होणार आहेत. त्या दृष्टीने बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमधील ‘ई-पॉस’ मशीन अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. या
सुविधेची राज्यव्यापी अंमलबजावणी महिन्याभरात कोल्हापुरात होत आहे.
सध्या ई-पॉस मशीनद्वारे ग्राहकाचा अंगठ्याचा किंवा बोटाचा ठसा घेऊन दुकानदाराकडून ग्राहकाला धान्य दिले जाते. या मशीनवर ठसा उमटविल्यावर आपल्याला देय असलेल्या धान्याची पावती येते. मग त्यानंतर धान्य वितरित केले जाते. अशा पद्धतीने या मशीनद्वारे रेशनिंगचे व्यवहार सुरू आहेत. शासनाने यापुढील पाऊल उचलत या मशीनवर दुसऱ्यांदा ठसा उमटविल्यावर आता धान्य खरेदीनंतर ग्राहकाच्या खात्यावरील पैसे दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होतील, अशी सुविधा केली आहे. त्या दृष्टीने मशीनचे अद्ययावतीकरण करण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. यामध्ये काही प्रोग्रॅम बदलले असून, यातील सॉफ्टवेअरही बदलले आहे. या सुविधेची राज्यव्यापी अंमलबजावणी बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमध्ये अव्वल स्थानी असणाºया कोल्हापूर जिल्ह्यातून होणार आहे. सध्या नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचे काम सुरू आहे.
आर्थिक व्यवहारासाठी कराव्या लागणाºया किचकट आॅनलाईन प्रक्रियेमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना ही अडचण जाणवते. या सुविधेच्या निमित्ताने सरकारने रेशनिंगमध्येही कॅशलेस व्यवहारासाठी चालना दिली आहे.
असे होतील व्यवहार
या मशीनवर पहिला ठसा उमटविल्यावर धान्याची पावती येऊन धान्य मिळणार.
दुसरा ठसा उमटविल्यावर खात्यातून संबंधित दुकानदाराच्या खात्यात रक्कम जमा होणार.
जितके धान्य घेणार, तितकी निश्चित केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यातून कमी होणार.