बोटी, लाईफ जॅकेटसह अत्याधुनिक यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:37+5:302021-06-02T04:18:37+5:30
चोहोबाजूंनी वाहणाऱ्या नद्या, मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होणारा पाऊस, त्यामुळे पाण्याचा विसर्गामुळे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. दोन ...
चोहोबाजूंनी वाहणाऱ्या नद्या, मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होणारा पाऊस, त्यामुळे पाण्याचा विसर्गामुळे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराच्या अनुभवानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. गेल्यावर्षी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पूरस्थिती टाळता आली. आतादेखील पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मंत्री, मुख्य सचिवस्तरावर चर्चा व नियोजन केले जात आहे. दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणात २४ तास अलर्ट आहे.
विभागाकडे सध्या ५० रबराईज्ड मोटार बोट आहेत, आणखी सात बोटींचे टेंडर काढण्यात आले असून त्या १५ तारखेपर्यंत जिल्ह्यात दाखल होतील. या काळात नागरिकांच्या बचावासाठी आपदा मित्र व आपदा सखी अशी १२०० जवान-स्वयंसेवकांची फौज तयार असून त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
--
विभागाकडील यंत्रणा
५० रबराईज्ड बोट
-७०० लाईफ जॅकेट, लाईफ रिंग
-इर्मजन्सी लाईट
-झाड, स्लॅब, लोखंडी बार, दगड कापण्याचे मशीन
-१२०० स्वयंसेवक
----
वर्षभर तीन शिफ्टमध्ये काम
अन्य जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षा सुरू केले जाते. कोल्हापुरात मात्र वर्षभर आणि २४ तास हे कक्ष कार्यरत असते. सध्या कोरोनावरील उपचारात वापरण्यात येणारे रेमडेसिविरचे नियंत्रण कक्ष येथेच सुरू आहे. याशिवाय विभागावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. येथे तीन शिफ्टमध्ये २५ कर्मचारी कार्यरत असतात.
---
संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण सज्ज आहे. विभागाकडे बचावकार्यासाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा असून या ताफ्यात नवीन ७ बोटी दाखल होणार आहेत.
प्रसाद संकपाळ
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
--
आपत्ती नियंत्रण कक्षाकडील दूरध्वनी
टोल फ्री नबर : १०७७
दूरध्वनी क्रमांक : २६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४.
---
फोटो नं ०१०६२०२१-कोल-आपत्ती व्यवस्थापन ०१,०२,०३
ओळ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मंगळवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील स्वयंसेवक व नियंत्रण कक्ष सज्ज होता (छाया : नसीर अत्तार)