Kolhapur: पक्षकाराच्या मालमत्तेत हिस्सा मागितला; ॲड. रणजीतसिंह घाटगेची पाच वर्षांसाठी सनद रद्द
By उद्धव गोडसे | Published: October 17, 2023 02:38 PM2023-10-17T14:38:42+5:302023-10-17T14:39:41+5:30
बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीचा निर्णय
कोल्हापूर : पक्षकार महिलेचा खटला चालवण्यासाठी ११ लाख रुपयांचे शुल्क घेऊन, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी मालमत्तेतील ३३ टक्के हिस्सा देण्याचे लिहून घेतल्याबद्दल ॲड. रणजीतसिंह सुरेशराव घाटगे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांची सनद पाच पर्षांसाठी रद्द झाली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली. असा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इचलकरंजी येथील एका महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर सासरच्या नातेवाईकांनी तिचा मालमत्तेवर अधिकार नाकारला. त्यानंतर संबंधित महिलेने ॲड. घाटगे यांच्याकरवी न्यायालयात दावा दाखल केला. खटला लढवण्यासाठी दोन कोटी रुपये फी देण्याचे ठरले होते. यातील ११ लाख रुपये ॲड. घाटगे यांना पोहोचले होते. उर्वरित रकमेसाठी मालमत्तेतील ३३ टक्के हिस्सा देण्याचे वकिलांनी महिलेकडून लिहून घेतले. शिवाय योग्य पद्धतीने खटला लढवला नाही. याबाबत पक्षकार महिलेने बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली. कौन्सिलचे शिस्तपालन समितीचे सदस्य ॲड. आशिष देशमुख यांनी चौकशी करून ॲड. घाटगे यांना सकृतदर्शनी दोषी ठरवले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही तक्रार तीन सदस्यीय समितीकडे वर्ग केली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेऊन समितीने ॲड. घाटगे यांची सनद पाच वर्षांसाठी रद्द केली. तसेच व्याजासहित १४ लाख रुपये तक्रारदार महिलेस परत देण्याचा निर्णय दिला. दंडाची रक्कम अदा न केल्यास तहहयात सनद रद्द होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.