पुन्हा खणखणला शड्डूंचा आवाज, तब्बल नऊ महिन्यांनंतर तालमी, आखाडे खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:23 PM2020-12-17T12:23:39+5:302020-12-17T12:28:36+5:30
CoronaVirusUnlock, Wrestilin, Kolhapur कोरोनाच्या कहरामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले कोल्हापुरातील कुस्तीचे आखाडे, तालमी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शड्डूंचे आवाज व जोर-बैठकांचे हुंकार घुमू लागले आहेत.
कोल्हापूर : कोरोनाच्या कहरामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले कोल्हापुरातील कुस्तीचे आखाडे, तालमी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शड्डूंचे आवाज व जोर-बैठकांचे हुंकार घुमू लागले आहेत.
गेल्या २० मार्च २०२० पासून जगभरात कोरोनाचा कहर वाढला होता. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद करून सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यात सर्वाधिक शारीरिक जवळिकीचा खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिले जाते. त्यामुळे बहुतांश खेळप्रकार सुरू झाले. मात्र, कुस्तीला सरकारने हिरवा कंदील दाखविला नाही. त्यामुळे नऊ महिन्यांनंतर १५ डिसेंबरपासून राज्यासह कोल्हापुरातील बहुतांश तालीम, आखाडे कोरोनापासून दक्षता बाळगून सुरू करण्यात आले.
यात कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेश तालीम, शाहूपुरी तालीम, शाहू आखाडा, आदी तालमींमध्ये आपापल्या गावी गेलेले मल्ल पुन्हा सरावासाठी दाखल झाले आहेत. या मल्लांनी वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे पुन्हा एकदा या तालमींमध्ये जोर-बैठकांचे हुंकार व शड्डूंचे आवाज घुमू लागले आहेत. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची अग्रणी तालीम म्हणून ओळखली जाणारी मोतीबाग तालीम मात्र, अद्यापही खुली करण्यात आलेली नाही. ही तालीम शनिवार (दि. १९) पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे डिसेंबर-जानेवारी या महिन्यांत कुस्तीपंढरीत कुस्ती अधिवेशनाची आस लागते. त्यात महाराष्ट्र केसरीसह महाराष्ट्र चॅम्पियन आदी मल्लांच्या स्वप्नातील स्पर्धा होतात. महाराष्ट्र कुस्ती परिषदेने स्पर्धा जाहीर केली तर मिळालेल्या कालावधीचा उपयोग करून अनेक मल्लांनी बाजी मारण्याचा चंग बांधून तयारीला जोरदार सुरुवात केली आहे.
कुस्ती परिषदेने जर यंदाचे अधिवेशन जाहीर केले तर त्याकरिता मल्लांना सरावासाठी रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.
- कृष्णात पाटील,
कुस्ती प्रशिक्षक