कोल्हापुरात रात्री १२च्या ठोक्याला साऊंडचा ठेका बंद म्हणजे बंदच, जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:53 AM2023-09-27T11:53:12+5:302023-09-27T11:53:28+5:30

सर्वच मूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच

Sound system shut down at 12 midnight in Kolhapur, orders of the Collector | कोल्हापुरात रात्री १२च्या ठोक्याला साऊंडचा ठेका बंद म्हणजे बंदच, जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश 

कोल्हापुरात रात्री १२च्या ठोक्याला साऊंडचा ठेका बंद म्हणजे बंदच, जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश 

googlenewsNext

कोल्हापूर : अनंत चतुर्दशीनिमित्त उद्या गुरुवारी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टीम रात्री १२ वाजता बंद म्हणजे बंदच केले जातील. मूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच केले जाईल, त्यादृष्टीनेच विसर्जन मिरवणुकीचा मार्ग राहील. महापालिका, पोलिस प्रशासनाने मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली.

अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिक्के यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, महापालिकेच्या विभागीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, मिरवणूक मार्गावरील रस्त्यांमधील खड्डे भरून घेण्यात येत आहेत. पोलिस निरीक्षकांनी भागातील मंडळांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवाव्यात. मिरवणूक संपेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात असेल.

इराणी खणीचा कायमस्वरूपी विकास

दरवर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी इराणी खण परिसरात स्वच्छता, सपाटीकरण, परिसर बंदिस्त करणे अशा अनेक कामांसाठी मोठी यंत्रणा लावावी लागते. त्याऐवजी परिसराच्या कायमस्वरूपी विकासाचा आराखडा महापालिकेने सादर करावा, जिल्हा नियोजन समितीपुढे तो ठेवला जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केली.

भूमिगत विद्युत वाहिन्या

अंबाबाई मंदिर बाह्य परिसर, महाद्वार रोड येथे भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे विसर्जन मिरवणूक मार्गावरील भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी प्रस्ताव द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा नियोजन समितीतून त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


गणेश मंडळांनी आपली मिरवणूक रेंगाळू देऊ नये. दिलेल्या निकषानुसार वाहनांवर कमीत कमी साऊंड सिस्टीम व अन्य साहित्यांचा वापर करावा. पोलिसांच्या सूचनांचे पालन करून उत्सवाचा आनंद घ्यावा. - राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

 

अशी असेल व्यवस्था

  • मिरवणूक मार्गावर ६६ सीसीटीव्हींचा वॉच
  • ठिकठिकाणी दामिनी पथक, वैद्यकीय पथके
  • पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची सोय
  • धोकादायक १३ इमारतींना सुरक्षित शेड
  • हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी नागरिकांसाठी स्वच्छतागृहे खुली ठेवावीत

Web Title: Sound system shut down at 12 midnight in Kolhapur, orders of the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.