मिरज दरोड्यात शेजारीच सूत्रधार
By Admin | Published: March 31, 2015 12:35 AM2015-03-31T00:35:22+5:302015-03-31T00:36:27+5:30
आठजण जेरबंद : २४ तासांत छडा; तोतया अधिकारी बनून टाकला होता दरोडा
मिरज : आयकर व पोलीस अधिकारी असल्याचा बहाणा करून मिरजेतील धान्य व रॉकेल विक्रेते आबा ऊर्फ अभिजित जाधव यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या आठजणांच्या टोळीला रविवारी रात्री पोलिसांनी अटक केली, तर एकजण फरार झाला आहे. जाधव यांच्या मुलाचा मित्र व शेजारील राहुल सतीश माने हाच दरोड्यासाठी टीप देणारा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. केवळ २४ तासांत या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या गुंडाविरोधी पथकाला पोलीस अधीक्षकांनी पारितोषिक जाहीर केले.
विद्यानगर परिसरातील अभिजित जाधव (वय ३७) यांच्या घरात त्यांचा शेजारी व मुलाचा मित्र राहुल सतीश माने (वय २२, रा. माजी सैनिक वसाहत, मिरज) याने पुण्यातील टोळीला टीप देऊन हा दरोड्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे.
राहुलच्या सांगण्याप्रमाणे मिरजेत येऊन तोतया आयकर व पोलीस अधिकारी बनून जाधव यांच्या घरावर दरोडा टाकणारे रणजितसिंग लक्ष्मणसिंह रजपूत (२६, रा. मु. पो. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर), धोंडिराम वसंत शिंदे (३२, रा. दांगट बिल्डिंग, सिंहगड रोड पुणे, मूळ गाव बेलगे, ता. चाकूर, जि. लातूर), सोमनाथ ऊर्फ गोट्या बाळासाहेब शेलार (२५, रा. नांदोशी, ता. हवेली, जि. पुणे), उमेद रफिक शेख (२३, रा. खडकवासला, किरनमते चाळ पुणे, मूळ गाव चिंचोणीमाळी, ता केज, जि. बीड), नितीन वसंतराव पारधी (२९, रा. नांदेड फाटा सिंहगडरोड पुणे, मूळ गाव नागापूर कुळवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), संतोष तुकाराम गाडेकर (३१, रा. बेकराईनगर, जुने हडपसर पुणे, मूळ गाव मेडशिंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), अरिफ हसनसाब शेख (२६, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड पुणे, मूळ गाव बोसे, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांना पोलिसांनी अटक केली.
शुक्रवारी रात्री या संशयितांनी आयकर व मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी आहोत, असे सांगून, जाधव यांच्या घरात प्रवेश करून अभिजित जाधव यांना, त्यांच्याविरुद्ध मुंबईत फिर्याद दाखल झाल्याचे सांगून, घरातील सर्वांना एका ठिकाणी बसवून घराची झडती घेतली. घरातील सर्व साहित्य विस्कटून जाधव कुटुंबीयांना त्यांच्याकडील पोलीस काठीने मारहाण केली. गुन्हा दाखल करण्याची व बेड्या घालण्याची धमकी देऊन घरातील ३० तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे १२ लाखांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.
जाधव यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने व दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर सर्व संशयित (एमएच ०६ एएम ००९९ क्रमांक)चॉकलेटी रंगाच्या जीपमधून पळून गेले.
चित्रपटातील दृश्याप्रमाणे आरोपींनी गुन्हा केला असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत सहा वेगवेगळी पथके पाठविली होती. मात्र, जाधव कुटुंबीयांची चौकशी करताना त्यांच्या मुलाचा मित्र राहुल माने यास संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. राहुलने पुण्यातील टोळीमार्फत जाधव कुटुंबीयांना लुटल्याची कबुली दिली. लुटलेले सोन्याचे दागिने व रोख रकमेची पिलीव (ता. माळशिरस) येथील मंदिराजवळ वाटणी होणार आहे, अशीही माहिती त्याने दिली. त्याला ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या पथकाने पिलीव येथे छापा टाकून संशयिताना अटक केली. दरोडा टाकण्यासाठी वापरलेली जीप व १९ तोळे सोन्याचे दागिने, साडेचार लाखांच्या रोख रकमेपैकी १ लाख २४ हजार रोख रक्कम असा ऐवज हस्तगत केला. उर्वरित दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक सावंत यांनी सांगितले. आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणणाऱ्या गुंडाविरोधी पथकास १५ हजारांचे पारितोषिक देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. संशयितांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांनी ‘स्पेशल २६’ हा चित्रपट पाहून गुन्ह्याची कल्पना सुचल्याची कबुली दिली आहे. यातील सोमनाथ ऊर्फ गोट्या बाळासाहेब शेलार (रा. नांदोशी, जि. पुणे) याने चित्रपट संगीतकार अजय-अतुल यांच्या साडूचे अपहरण करून खंडणी मागितली होती.
याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो दोन वर्षे येरवडा तुरुंगात होता. धोंडिराम शिंदे याच्याविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात दरोड्याचे दोन गुन्हे दाखल असून, तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. उर्वरित सातजण रिक्षाचालक व अन्य किरकोळ व्यवसाय करणारे आहेत. यापैकी कोणीही उच्च शिक्षण घेतलेले नाही. मात्र, आयकर अधिकारी म्हणून त्यांनी जाधव कुटुंबीयांवर छाप पाडली होती. गणेश भिसे (रा. पुणे) हा अन्य एक संशयित फरार झाला आहे. (प्रतिनिधी)
लॅपटाप प्रकरणामुळे संशय
राहुल माने हा आबा जाधव यांचा मोठा मुलगा अनिरुद्ध याचा मित्र आहे. अनिरुद्धने चोरीचा लॅपटॉप घेतल्याचे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर राहुलनेच मध्यस्थी करून प्रकरण मिटविले होते. तोतया आयकर अधिकाऱ्यांनी लॅपटॉप प्रकरणाचा उल्लेख केल्याने गुंडाविरोधी पथकाचे सागर लवटे व गुंड्या खराडे यांना राहुल मानेचा संशय आला. पिलीव येथे वाटणी घेण्यास जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संशयितांनी पळून जाताना गाडीतच दागिने व रकमेची वाटणी केली होती. वाटणी केलेला लुटीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
कात्रजमध्ये
संशयितांची ओळख
टेम्पोचालकाचा मुलगा असलेला राहुल माने अकरावी नापास असून, तो कोणताही कामधंदा करीत नाही. तो कात्रज (पुणे) येथे मामाकडे गेला असता त्याची संशयितांशी ओळख झाली. त्यानंतर मिरजेत आबा जाधव यांना लुटण्याचा बेत ठरला. पुण्यातील टोळी मिरजेत आल्यानंतर राहुल त्यांच्यासोबत पंढरपूर रस्त्यावरील एका ठिकाणी थांबला होता. सर्व संशयितांना त्याने कुपवाड येथील दुकानातून ओळखपत्रे घेऊन दिली होती. जाधव यांच्या घरातील ऐवज लुटत असताना तो घराबाहेर थांबला होता. काम फत्ते झाल्यानंतर तो वाटणी घेण्यासाठी जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागल्याने दरोड्याची घटना उघडकीस आली.