नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा
By admin | Published: July 23, 2014 10:05 PM2014-07-23T22:05:36+5:302014-07-23T22:32:16+5:30
मंदिर परिसरात पाणी आल्याने परिसरातील साहित्य सुरक्षितस्थळी
नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात आज, बुधवारी सकाळी आठ वाजता ‘दक्षिणद्वार सोहळा’ झाला. हा सोहळा दुपारी बारा वाजेपर्यंत चालल्याने हजारो भाविकांनी ‘श्री गुरुदेव दत्त’च्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला.
पावसाने लावलेली दमदार हजेरी, तसेच धरणांतून होणारा विसर्ग यामुळे येथील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत गेल्या २४ तासांत पाच फुटांनी वाढ झाली व कृष्णा नदीचे पाणी येथील दत्तचरणांजवळ आल्याने सकाळी आठ वाजता दत्तमंदिरात नृसिंहवाडी परिसर, शिरोळ, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर व आलास, आदी परिसरातून भाविकांनी दुर्लभ अशा सोहळ्यात स्नानाचा आनंद घेतला. स्नानासाठी महिलांचाही मोठा सहभाग होता. दत्तमंदिरात कृष्णा नदीचे पाणी आल्याने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी श्री नारायणस्वामी महाराज यांच्या मठात ठेवण्यात आली आहे. येथील दत्तदेव संस्थानमार्फत भाविकांना सुलभ स्नान होण्यासाठी रांगेची व सुरक्षारक्षकांची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात पाणी आल्याने परिसरातील साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
गगनबावड्यात मुसळधार पाऊस
साळवण : गगनबावडा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत गगनबावडा येथे ११५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत २२.७७ मि.मी. पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस असंडोली येथे २१० मि.मी. इतका विक्रमी पाऊस झाला आहे. तिसंगी पैकी टेकवाडीस आज सायंकाळी पुराचा वेढा पडला. दुसऱ्यांदा कुंभी, जांभळी, सरस्वती या नद्यांना पूर आला. अणदूर बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी धुंदवडे खोऱ्यातील वाहतूक बंद झाली आहे. अणदूर आणि धुंदवडे खोऱ्याचा संपर्क तुटला आहे. मांडुकली, वेतवडे बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे मांडुकली गावठाण, खोपडेवाडी, मणदूर, वेतवडे, बालेवाडी, आदी गावांचा आज सकाळपासूनच संपर्क तुटला आहे. दोन दिवस साळवण परिसरात वीजपुरवठा बंद आहे.
ताम्रपर्णी, घटप्रभा नदीला पूर;
कोवाडमध्ये घरावर झाड कोसळले
चंदगड : चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ताम्रपर्णी व घटप्रभा नदीला पूर आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोनेवाडी, चंदगड, आसगाव, गवसे, हिंडगाव, बुझवडे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
वादळी व मुसळधार पावसाने कोवाड येथील कृष्णा कल्लाप्पा नाईक यांच्या घरावर झाड कोसळून छपराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कालकुंद्री ते कळसगादे येथील दोन घरांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसाने तालुक्यातील आठ मार्ग बंद झाल्याने चंदगड आगाराने या मार्गावरील २० बसफेऱ्या रद्द केल्यामुळे आजच्या दिवसात चंदगड आगाराचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवसभरात तालुक्यात ७९ मि.मी., तर आजपर्यंत ९३७ मि.मी. पावसाची नोंद झाली.
शेतकरी वर्गात समाधान
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेले चार ते पाच दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मशागतीची कामे उरकली आहेत. कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.