‘दक्षिण’मध्ये महाडिक-पाटील या दोघांतच पुन्हा ठरलंय! --

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:12 AM2019-07-17T01:12:29+5:302019-07-17T01:15:20+5:30

लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांची कोल्हापूर दक्षिणमध्ये झालेली पीछेहाट ही आमदार महाडिक यांच्यासाठी आगामी विधानसभेकरिता धोक्याची घंटा आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाडिक गटाकडून नेटाने तयारी सुरू आहे.

 In the South, Mahadik-Patil has decided again! | ‘दक्षिण’मध्ये महाडिक-पाटील या दोघांतच पुन्हा ठरलंय! --

‘दक्षिण’मध्ये महाडिक-पाटील या दोघांतच पुन्हा ठरलंय! --

Next
ठळक मुद्देअटीतटीची लढत होणार : गतवेळचे उट्टे काढण्यासाठी सतेज पाटील यांची जोरदार तयारी विधानसभा निवडणूक कोल्हापूर दक्षिण मतदारसंघपूर्वरंग

संतोष मिठारी ।

कोल्हापूर : शहरी आणि ग्रामीण परिसराचा समावेश असलेला आणि जिल्ह्यातील दहापैकी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ म्हणून ‘कोल्हापूर दक्षिण’ ओळखला जातो. या मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यात अटीतटीचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. विकासकामांच्या जोरावर आमदार महाडिक यांनी या निवडणुकीत पुन्हा बाजी मारण्याची तयारी केली आहे. लोकसभेला घेतलेली ‘महाडिक नकोच’ ही भूमिका घेऊन आमदार पाटील गेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.

सुशिक्षित, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य, गरीब असे संमिश्र मतदार या मतदार संघात आहेत. करवीर तालुक्यातील वळिवडे ते निगवे खालसा पर्यंतची ३६ गावे आणि महानगरपालिका हद्दीतील २७ पूर्ण व तीन निम्मे प्रभाग या मतदारसंघांमध्ये येतात. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (संघ) आणि शाहू साखर कारखान्याचा या मतदारसंघातील पूर्व भागात प्रभाव आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपबरोबरच शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही या मतदारसंघात ताकद आहे. सन २०१४ मधील

विधानसभा निवडणुकीवेळी आमदार सतेज पाटील हे गृहराज्यमंत्री होते. निवडणूक महिन्यावर आलेली असतानाही त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात कुणी उमेदवार नसल्याचे चित्र होते. २० दिवसांवर निवडणूक असताना भाजपकडून अमल महाडिक यांनी उमेदवारी मिळविली. सतेज पाटील, अमल महाडिक, विजय देवणे यांच्यासह एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते; मात्र, खरी लढत पाटील आणि महाडिक यांच्यात झाली. त्यामध्ये महाडिक यांनी आठ हजार ५२८ मताधिक्क्यांनी पराभवाचा धक्का दिला. या मतदारसंघात नवखे असूनही महाडिक गटाची ताकद आणि मोदी लाटेच्या जोरावर अमल महाडिक यांनी बाजी मारली. त्यावेळी आमदार पाटील यांच्या चुकांही त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कोल्हापूर शहर आणि दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले होते. त्यातच महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक २७ जागांवर विजय मिळविला. दक्षिण मतदारसंघातील १६ प्रभागांमध्ये मोठ्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत सतेज पाटील यांनी आपले अस्तित्व अबाधित राखले. त्यानंतर झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही पाटील यांनी विधानसभेतील पराभवाची व्याजासह परतफेड केली. त्यामुळे पाटील गटाला उभारी आलीच; त्याशिवाय जिल्ह्णाच्या राजकारणात पाटील यांचा दबदबा वाढला.

आमदार पाटील यांनी गेल्या चार वर्षांत विकासकामे, मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पाटील गट आघाडीवर राहिला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा महाडिक-पाटील यांच्यातच खरी लढत झाली. ‘आमचं ठरलयं’ या टॅगलाईनखाली पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली. स्वत:ची उमेदवारी असल्यासारखे नेटाने काम केले. विधानसभेपूर्वीच्या ‘लिटमस टेस्ट’मध्ये आमदार पाटील यशस्वी झाले आणि ‘दक्षिण’मधून संजय मंडलिक यांना ५० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य दिले. या निकालाने पाटील यांच्या गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे; पण विधानसभा आणि लोकसभेचे रागरंग वेगवेगळे असतात. मंडलिक यांना मोठे मताधिक्य मिळण्यामागे अनेक कंगोरे होते.

आमदार अमल महाडिक यांनी रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, आदी स्वरूपांतील पायाभूत सुविधा आणि विकासकामे त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागांत केली आहेत. विमानतळ, पाणीपुरवठा, आदी स्वरूपांतील प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, महाडिक गटाचे कार्यकर्ते वगळता मतदार, शिवसैनिक, भाजपचे जुने कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा फारसा संपर्क नसल्याने त्यांच्याबाबत नाराजी आहे. गेल्या निवडणुकीत मदत केलेल्या शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांसह विविध गावांतील नेतेमंडळींकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांची कोल्हापूर दक्षिणमध्ये झालेली पीछेहाट ही आमदार महाडिक यांच्यासाठी आगामी विधानसभेकरिता धोक्याची घंटा आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाडिक गटाकडून नेटाने तयारी सुरू आहे.


शिवसेना पैरा फेडणार ?
‘दक्षिण’मध्ये आमदार पाटील यांनी उघडपणे शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांचा प्रचार केला. त्यामुळे विधानसभेला शिवसेना हा पैरा
फेडण्याची चिन्हे आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारास ९ हजारांवर मते मिळाली आहेत.

तिसऱ्यांदा लढत
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये पहिल्यांदा सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली. आता यावर्षी सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात लढत होत आहे. सतेज पाटील गट आणि महाडिक गटावरच या मतदारसंघातील राजकारण अवलंबून आहे.

सतेज पाटील यांच्या जमेच्या बाजू

गावागावांतील कार्यकर्ते, लोकांशी
थेट संपर्क
लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलयं’चे यश
गोकुळ मल्टिस्टेटला विरोधाची भूमिका.

अमल महाडिक यांच्या जमेच्या बाजू
विविध स्वरूपांतील केलेली विकासकामे
केंद्रातील भाजप सरकारला मिळालेले स्पष्ट बहुमत
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मदत.

 

Web Title:  In the South, Mahadik-Patil has decided again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.