पेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:49 PM2020-06-19T16:49:12+5:302020-06-19T16:54:38+5:30
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.
कोल्हापूर : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.
जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मृग नक्षत्र निघाल्यानंतर मात्र आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली. या कालावधीत पेरण्यांचा सपाटा लावण्यात आला. त्यानंतर चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने पेरण्यांची घाई उडाली; पण एकसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे पेरण्या करणे अवघड होऊन बसले आहे. त्यातही निचऱ्याच्या जमिनी असलेल्या ठिकाणी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची भर पावसात घाई सुरू आहे. खोल, गाळाच्या जमिनीत मात्र अजिबातच वाफसा नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत.
रोहिणी आणि मृगात झालेले भात, सोयाबीन, भुईमूग चांगले उगवले आहे. भातामध्ये कोळपणी, भांगलणीची कामे भरपावसात सुरू आहेत. रोपलागणीसाठी टाकलेले नाचणी व भाताचे तरवे चांगलेच तरालले आहे. पुढील पंधरवड्यात याच्या लागणी सुरू होतील. उसालाही मिरगी डोस देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
आडसाली लावणी सुरू
आडसाली आणि पूर्व हंगामी ऊसलागणीचे पूर्वनियोजन म्हणून आता सऱ्या पाडून ठेवण्यात आल्या आहेत. बोंडल्यावर सोयाबीन, भुईमूग, मूग पेरून सरीमध्ये लावण करण्याचे नियोजन आहे. आता आडसाली लावणी सुरू झाल्या असून आतापर्यंत ७०३ हेक्टरवरील लावणी पूर्णही झाल्या आहेत.
पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
- भात - ४६ हजार ९३१
- ज्वारी - ७८५
- नागली - १ हजार ६८५
- भुईमूग - १६हजार २६८
- सोयाबीन - २४ हजार ६०५
- ऊस - ७०३
कृषी विभागाकडे नोंद झाल्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ७४ हजार ६३९ हेक्टरपैकी ९३ हजार ५६१ हेक्टरवर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. यात भाताची पेरणी सर्वाधिक आहे.