मांडणशिल्पातून स्वप्नांची पेरणी
By Admin | Published: February 13, 2017 12:46 AM2017-02-13T00:46:36+5:302017-02-13T00:46:36+5:30
शिवोत्सव : कलागुणांच्या उधळणीत रंगला तिसरा दिवस
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या तरुणाईच्या कलाविष्काराचे शिखर ठरलेल्या ‘शिवोत्सव’ महोत्सवात रविवारचा दिवस कलागुणांच्या मुक्त उधळणीत न्हाऊन निघाला. ‘माय ड्रीम’ या थीमवर आधारित मांडणशिल्पातून देशभरातून आलेल्या विविध विद्यापीठांच्या कलाकारांनी स्वप्नांची पेरणी केली.
तिसऱ्या दिवसाच्या महोत्सवाची सुरुवात मांडणशिल्प कलाप्रकाराने झाली. मानव्यशास्त्र इमारतीसमोरील आवारात झालेल्या स्पर्धेत झाडाच्या फांद्या, गवत, पाने, फुले, विटा, वर्तमानपत्रांची रद्दी, फुटक्या पाईप्स, मोकळे बॉक्स, कागदी प्लेट्स, आदी मिळेल त्या वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांनी कलाकृतींची मांडणी केली. त्यामध्ये पंधरा संघांनी सहभाग घेतला. राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘ग्रीन सोसायटी, क्लीन सोसायटी’ ही संकल्पना मांडत विकासासोबत पर्यावरणाचाही तितकाच विचार करायला हवा आणि फक्त समस्यांवर चर्चा न करता पारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करून प्रदूषण कसे कमी करता येईल, हेदेखील मांडले.
गुलबर्गा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकाचे स्वप्न ही संकल्पाने मांडत मेक इन इंडिया, कॅशलेस सोसायटी, स्वच्छ भारत अभियान, आदी माध्यमांतून कसा प्रगतिपथावर जात आहे याची मांडणी केली; तर रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाने युवा पिढीच खऱ्या अर्थाने शांतीचं प्रतीक बनू शकते, हे आपल्या कलाकृतीतून मांडण्याचा प्रयत्न केला. रांची विद्यापीठाने आपल्या कलाकृतींतून जागतिक शांततेचा संदेश दिला. पंजाबच्या लव्हली विद्यापीठाने प्लास्टिकच्या वापरामुळे समाजजीवन कसे भोवऱ्यात अडकले आहे, त्याची मांडणी केली.
देशातील विविधता व त्यातून एकतेची भावना संगीताच्या माध्यमातून कशी गुंफण्यात आली आहे, त्याची प्रचिती लोककला केंद्रात सादर झालेल्या सुगम गीतगायनातून आली. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कलाकारांनी ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हा अभंग सादर केला; तर पंजाबमधून आलेल्या ‘मैं जिसे पूज रहा था वो पत्थर निकला’, ‘अगर तलाश करूॅँ कोई मिल जाएगा... मगर तुम्हारी तरहा कौन मुझे चाहेगा’ अशा गजला सादर केल्या. त्यानंतर विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी स्थानिक भाषेतील प्रसिद्ध रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
एकांकिकांनी
गाजविला दिवस
महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत एकूण पंधरा संघांनी सहभाग घेतला. वि. स. खांडेकर भाषाभवनातील एकांकिका स्पर्धेत तिसऱ्या दिवशीच्या एकांकि केची सुरुवात भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी वृत्तपत्रविद्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या तुफान विनोदी ‘क्यों मारा’ या हास्यनाटिकेने झाली. त्यानंतर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या संघाने ‘वेलकम’ ही वेगळ्या विषयावरील एकांकिका सादर केली. मनुष्यजीवनापासून मुक्तीनंतरच खऱ्या अर्थाने नव्या जगण्याचे वेलकम होते, असा आशय असलेल्या या कलाकृतीने उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुवाहाटीच्या कॉटन कॉलेजने स्त्रियांच्या वर्तमान स्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘और एक शकुंतला’मधून सामाजिक प्रश्नांची मांडणी केली.
‘नोटाबंदी’वरील वादविवाद रंगला
‘आर्थिक विकासासाठी नोटा निश्चलनीकरण हा एकमेव उपाय’ या विषयावर निलांबरी सभागृहात आयोजित वादविवाद बौद्धिक चर्चा, दाखले, संदर्भ दाखले यांनी रंगला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी घेण्यात आलेला सर्वांत योग्य निर्णय म्हणून केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे एक बाजूला स्वागत करून समर्थन करण्यात आले; तर दुसऱ्या बाजूने या निर्णयाला कडाडून विरोध करीत हा निर्णय गरिबांना अधिकाधिक गरिबीच्या खाईत लोटणारा आहे, असा कडाडून प्रतिवादही करण्यात आला.
सलाम इंडियन आर्मी
महोत्सवात मांडणशिल्प कलाप्रकारात सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘माय ड्रीम’ या संकल्पनेवर आधारित सैन्यदलातील जवानांच्या खडतर जीवनप्रवासावर आधारित कलाकृती मांडली. युद्धप्रसंगी त्याला ज्या कठीण परिस्थतीशी सामना करावा लागतो, त्या भावना कलाकृतीतून मांडल्या. या कलाकृतीची मांडणी संगमेश्वर बिराजदार, ओंकार साठे, प्रदीप भद्रशेट्टी, विक्रांतसिंह चव्हाण या विद्यार्थ्यांनी केली.