अवकाश संशोधन केंद्र अजून अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:32 AM2017-08-22T00:32:03+5:302017-08-22T00:32:03+5:30
नितीन भगवान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पन्हाळा : पन्हाळ्यातील शिवाजी विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्र विद्यापीठाच्या उदासीनतेमुळे ‘जैसे थे’ स्थितीत असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)कडून मिळालेल्या रिसिव्हरचा वापरच होत नसल्याने पन्हाळा संशोधन केंद्र ठप्प आहे.
वीस वर्षे पन्हाळ्यावर अवकाश संशोधनासाठी जागा मिळविण्यासाठी झुंज देत शिवाजी विद्यापीठाने एक एकर निमजगा माळावर जागा मिळविली आहे. जवळच टेलिफोन एक्स्चेंज आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन केले. विद्यापीठास सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अवकाश संशोधन हा विषय असून, त्याची गंभीरता त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली नाही. या ठिकाणी पत्र्याचे शेड उभे केले. विद्यापीठाला म्हणे पुरातत्व विभाग इमारत बांधण्यास परवानगी देत नसल्याचे सांगितले जात आहे. मग जवळच असलेल्या टेलिफोन एक्स्चेंजने इमारत कशी बांधली? असा सवाल केला जात आहे. विद्यापीठाने या संशोधन केंद्रासाठी उभ्या केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवकाश संशोधनासाठी लागणारी दुर्बीण, संगणक व अन्य साहित्य धूळ, धुके, पाऊस व हवा यांचा परिणाम होत असल्याने ठेवले जात नाही, तर या सर्व गोष्टींचा वापर ज्यावेळी करावयाचा त्यावेळी हे साहित्य कोल्हापूरमधून आणावयाचे. त्याची जोडणी करून वापर करावयाचा या कारणास्तव या संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ए. के. शर्मा महिन्यातून दोन वेळाच येतात. अवकाश संशोधन या विषयात शिक्षण घेणारे केवळ तीन विद्यार्थी आहेत. विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ए. के. शर्मा म्हणाले, विद्यापीठाकडे कुठे जायचे म्हणून गाडी मागितली तर सकाळी दहा वाजता मागितलेली तर ती वेळाने मिळते. त्यामुळे संशोधन या विषयाची महती व गंभीरता नसल्याने पाहिजे असे प्रोत्साहन मिळत नाही. विद्यापीठ आवारातील निवास्थानी अवकाश संशोधनाची काही ताºयांची व ग्रहांची प्रतिकृती तांबे या धातूच्या पाईपची करावी लागतात. ती केली होती. त्यांची चोरी झाली, तर आपण राहत असलेल्या घराच्या वरच्या माळ्यावरील प्रयोगशाळेतील एलईडी मोठा पडद्याचा टीव्ही चोरीला गेला.
दुर्बीण जर्मन बनावटीची
१ पन्हाळ्यातील आकाशाची स्पष्टता व स्वच्छ प्रकाश ही इतर तुलनेत दहा पटीने चांगली असल्याने या ठिकाणी अवकाश संशोधन करणे चांगला योग असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. पन्हाळ्यातील अवकाश संशोधन केंद्रात असणारी दुर्बीण जर्मन बनावटीची असून, त्याचा अवकाश पल्ला दोन किलोमीटरपर्यंत आहे.
२ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) संस्थेने दिलेल्या रिसिव्हरने अवकाशातील शनी ग्रहाची कडी व्याध तारा गुरूग्रहाची निरीक्षणे करणे शक्य असून,जवळील देशातील शहरे व त्यातील बारीकसारीक गोष्टी या रिसिव्हरद्वारे पाहू
शकतो.
३ प्रा. डॉ. ए. के. शर्मा यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व प्रा. डॉ. यशपाल यांच्याबरोबर संशोधनात काम केले आहे. ‘फिजिकल रिसर्च लॅबरोटरी व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जिओमॅग्नेटीझम’ या दोन राष्ट्रीय अवकाश निरीक्षण संस्था पन्हाळा अवकाश केंद्रावर काम करण्यास उत्सुक असल्याचे डॉ. शर्मा म्हणाले.