‘मान्सून आला, महापूर येणार का ?’
By वसंत भोसले | Published: June 12, 2022 08:30 PM2022-06-12T20:30:33+5:302022-06-12T20:33:25+5:30
हवामान बदलाच्या परिणामांनुसार जोरदार पाऊस झाल्यास महापूर येणार आहेच. त्याचे पाणी अडणार आहे. नुकसान होणार आहे. कृष्णा खोऱ्यातील लोकांनीही ते ओळखले आहे. कारण सामान्य माणसांच्या हातात काही नाही.
वसंत भोसले,
संपादक, लोकमत, काेल्हापूर
हवामान बदलाच्या परिणामांनुसार जोरदार पाऊस झाल्यास महापूर येणार आहेच. त्याचे पाणी अडणार आहे. नुकसान होणार आहे. कृष्णा खोऱ्यातील लोकांनीही ते ओळखले आहे. कारण सामान्य माणसांच्या हातात काही नाही. ते दबाव निर्माण करण्यासाठीही भूमिका मांडू शकत नाहीत. मात्र, आयएएस अधिकारी, सचिव, सार्वजनिक खात्याचे तसेच पाटबंधारे खात्याचे अभियंते या शिकलेल्या अभिजन वर्गाला हे कळत नसेल का?
मान्सून पंधरा दिवस आधीच येणार, असे भाकीत भारतीय हवामान विभागाने करून ठेवले होते. प्रसारमाध्यमांतील अनेकांना मान्सूनचा पाऊस, त्याचे येणे, बरसणे याचा अंदाज डांबरी रस्त्यावरील पाणी खिडकीतून बघून ठरवितात. परिणामी, मान्सूनवर अवलंबून असणाऱ्यांना ताण सहन करावा लागला. आता मान्सूनने महाराष्ट्र-गोवा सीमेवरून पुढे सरकत प्रवेश करता तरी झाला आहे. हवामान बदलाचा फारसा गंभीर परिणाम जाणवणार नाही, असे म्हणत आणि मानत असताना गेल्या दोन-तीन वर्षात निसर्गाचे रौद्ररूप अनुभवायास मिळाला आहे. तसेच या मान्सूनच्या पावसात अनुभव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गेल्या तीन वर्षात प्रत्येक हंगामात (उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा) बदल जाणवत आहे. त्याचा फार मोठा परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. तो अधिकच होत राहिला तर शेती करणे अवघड होऊन बसेल. चालू वर्षी ऊस उत्पादन तसेच गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाच आहे.
चांगला आणि वारंवार पाऊस झाल्याने भारतातील उसाचे उत्पादनाने उच्चांक गाठून आजवरचा विक्रम मोडीत काढला आहे. गत हंगामातील उत्पादन आणि शिल्लक साखर पाचशे लाख टनापेक्षा अधिक होती. त्यापैकी शंभरलाख टन निर्यात करण्यात आली आहे. तरीदेखील चारशे लाख टन साखर भारताला अतिरिक्त आहे. हा सर्व परिणाम उत्तम आणि वारंवार झालेल्या पावसाचा होता. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील अमरावती विभागात ३० ते ७० टक्के उसाच्या उत्पादनात वाढ झाली. हा एक प्रकारचा सकारात्मक परिणाम असला तरी असमतोलच आहे. परिणामी, मराठवाड्यातील अठ्ठावीस साखर कारखाने अद्याप चालू आहेत. तिकडे मान्सून उशिरा पोहोचतो म्हणून बरे आहे. कारण हे कारखाने येत्या २० जूनपर्यंत चालवावे लागणार असा अंदाज आहे.
याउलट गव्हाच्या उत्पादनाचे झाले. भारत हा जगाच्या पाठीवरील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. गेल्या हंगामात ११ कोटी १० लाख टन गव्हाचे उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारचा होता. हा अंदाज ठरविण्यामध्ये अनेक मोठ्या संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश असतो. जगभरातील कृषीव्यवस्था आणि उत्पादनाचा ते अभ्यास करीत असतात. हवामान बदल म्हणजे अतिरिक्त किंवा अतोनात पाऊसच नव्हे. कोणताही हंगाम असला की, त्यात बदल होणे होय. तीन वर्षांपूर्वी हिवाळ्यात थंडीच गायब झाली होती. केवळ दोन-तीन आठवडेच थंडी जाणवली होती. तसा दोन वर्ष आठ दिवसात प्रचंड पावसाने धुमाकूळ घालून महापुराने हैराण करून सोडले होते. हे संपूर्ण देशभरात होते असेही नाही. गत उन्हाळ्याचा हंगाम उत्तर भारतात मार्चच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाला.
पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान आदी प्रांतात मात्र अखेरपर्यंत थंडी असते परिणामी रब्बी हंगामातील गव्हाचे उत्पादन अमाप येते, पण मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याचा चटका जाणवू लागला. सुमारे चाळीस डिग्री तापमान झाले त्याचा परिणाम असा झाला की, ११ कोटी १० लाख मेट्रिक टन गहू उत्पादनाचा अंदाज चुकला. १० कोटी ४ लाख टनच उत्पादन झाले. एक कोटी लाख टन गव्हाचे उत्पादन घटले. म्हणजे किती प्रचंड नुकसान आहे पहा? हा केवळ हवामान बदलाने बसलेला फटका आहे. यासाठी या बदलाकडे अधिक जाणीव जागृतीने पाहणे गरजेचे आहे.
मान्सून आला की, भीती वाटू लागते. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाला व्यापणाऱ्या कृष्णा खोऱ्यात पुन्हा महापुराचा तडाखा बसणार का ? गतवर्षी दि. २१ ते २६ जुलै या सहा दिवसांत झालेल्या सरासरी दोन हजार मिली मीटर पावसाने न भूतो (भविष्यती म्हणायचे धाडस नाही) असा महापूर आला. आजचा विक्रम मोडला. महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातच सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. नैसर्गिक किंवा पर्यावरणीय हानीची पाहणी नीट झाली की नाही. किंवा झाली असली तरीही नीटशी मांडलेली नाही.
शेतजमीन वाहून जाणे, सुपीक माती वाहून जाणे, वृक्षांची पडझड होणे आदी कितीतरी परिणाम होऊन गेले. मनुष्यबळ वाया जाणे, पशुधनाचा अपव्यय होणे, आदींचे नुकसान मोठे आहे. ते नुकसानीत मोजायची आपल्याकडे पद्धत नाही. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होऊन होणारे नुकसान कोठे मोजतो? महापुराचे पाणी कुठंवर आले आणि त्यात बुडाले काय? येवढाच विचार होतो. हा केवळ कृष्णा खोऱ्यातील विषय नाही. मागील महिन्यात आसाममध्ये प्रचंड प्रमाणात उन्हाळी पाऊस झाला. तो नेहमी होत नाही. सुमारे तीन लाख लोकांना बेघर व्हावे लागले. उन्हाळी पिकांचे नुकसान, रस्ते, इमारती पडल्या. संपूर्ण जनजीवन दोन आठवडे ठप्प होते.
अशा पार्श्वभूमीवर आता आपण २०२२ च्या पावसाळी हंगामाला सामोरे जातो आहोत. मागील चार वर्षातील प्रत्येक हंगामात बदल जाणवतो आहे. यापैकी एका वर्षी तर बारा महिने कमी-अधिक पाऊस पडला होता. आता हा धोका आपल्या अंगणात कायमचा उभा ठाकणार आहे. त्याचा विचार करून काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहे. मागील वर्षीचा महापूर पाहण्यासाठी आलेल्या राज्यकर्त्यांनी कृष्णा खोऱ्यातील महापुरांच्या कारणांचा शोध ध्यायला नेमलेल्या वडनेरे समितीचे अहवाल धूळ खाण्यासाठी तयार केलेत का? त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. वर्ष पाहता पाहता आणि महापुराची चर्चा करीतच निघून गेले. सरकारने वडनेरे समितीच्या शिफारशी पैकी एकाचीही अंमलबजावणी केली नाही.
किंबहुना त्या दिशेने पाऊल टाकणारा आराखडा तयार केला नाही. शहरांच्या भोवतालची पुररेषा, लाल किंवा निळी रेषा ठरवून प्रसारमाध्यमांना देऊन काही तरी करीत असल्याची हवा निर्माण करण्यात येत आहे. लाल रेषा मारली म्हणून पाणी भीतीने मागे थोडेच सरकणार आहे का ? असे अजिबात होणार नाही. महापुराचे पाणी लवकर वाहून न जाण्याची कारणे ही वडनेरे समितीने सांगितली आहेत. ते अडथळे दूर करायला हवे होते. त्याऐवजी त्या अडथळ्यात भर घालण्यात आली आहे. अशी अनेक पुलांची, रस्त्यांची कामे ‘विकास’ करण्यासाठी बांधून घेण्यात येत आहेत.
हवामान बदलाच्या परिणामांनुसार जोरदार पाऊस झाल्यास महापूर येणार आहेच. त्याचे पाणी अडणार आहे. नुकसान होणार आहे. कृष्णा खोऱ्यातील लोकांनीही ते ओळखले आहे. कारण सामान्य माणसांच्या हातात काही नाही. ते दबाव निर्माण करण्यासाठीही भूमिका मांडू शकत नाहीत. मात्र, आयएएस अधिकारी, सचिव, सार्वजनिक खात्याचे तसेच पाटबंधारे खात्याचे अभियंते या शिकलेल्या अभिजन वर्गाला हे कळत नसेल का? राष्ट्रीय महामार्ग नदी पात्राजवळ बांधत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे. कोल्हापूरला पंचगंगा नदीकडे जाताना सांगली फाट्यापासून दुकानाच्या माळा तयार झाल्या आहेत, मागील महापुरात ती वाहून गेली, तरी देखील महापूर उतरताच महिन्याभरात उभी राहिती. पाणी जाण्यात त्याचा अडथळा होत नसेल का? राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला कोणत्याही टपऱ्या उभी करायच्या नसतात. त्या संबंधित अधिकाऱ्यांना समजत नसेल? मंत्री, आमदार
ये-जा करतात त्यांना दिसत नसेल? आपण सारे विज्ञान आणि निसर्गाला समजून कसे घेत नाही, याचे आश्चर्य वाटते. नृसिंहवाडीत देवस्थान आणि पर्यटन विकासाच्या नावाखाली प्रचंड बांधकामे करण्यात आली आहेत, वास्तविक संपूर्ण नृसिंहवाडी गाव आता महापूरग्रस्त होत चालले आहे. तरी महापर्वाच्या नावाखाली अनेक बांधकामे करण्यात आली. नदीकाठावर देवस्थान असू द्या, उत्तर घाट असू द्या, पण काठावर बांधकामे केली तर पाणी जाण्यास अडथळा ठरणार नाही का?
सांगली, कुरुंदवाड, वाळवा, भिलवडी या गावांची अवस्थाही अशीच झाली आहे. आता तक्रार करून काही होईल असे वाटत नाही. सामान्य माणूस व्यवहारी असतो. तो हतबल असल्याने आपल्या सामान्यज्ञानाच्या आधारे व्यवहारी झाला आहे.
कुरुंदवाडला एका व्याख्यानमालेत बोलण्यासाठी गेलो होतो. व्याख्यानाचा समारोप करताना अलीकडच्या हवामान बदलाचा गांभीर्याने विचार करा, असे आवाहन केले. हे वाक्य संपताच मनात विचार आला, गांभीर्याने विचार करा म्हणजे लोकांनी काय करायचे? त्यांचे या सर्वांवर काेणते नियंत्रण आहे. मागील महापुरात कुरुंदवाडमध्ये किती पाणी आले होते. किती लोक वाहून गेले किंवा मृत्युमुखी पडले असे विचारले. समोरचे श्रोते म्हणाले, एकाचाही मृत्यू झाला नाही. पाणी वाढेल तसे गाव सोडून उंच माळरानावर राहण्यास गेलो. माणूस सोडा, एक मांजरही मेले नाही. मांजरे, कुत्री यांनाही आम्ही घेऊन गेलो, असे एका श्रोत्याने सांगितले. सामान्य माणूस आपल्या सामान्यज्ञानाने मार्ग काढत असतो. तो सहनशील आहे, हा आपल्या समाजाचा कमकुवतपणा समजून शिक्षित अभिजनवर्ग त्यांच्याशी व्यवहार करतो. आता मान्सून आल्याची चाहूल तरी लागली आहे. महापूर येतो का तेवढे सावधपणे पाहणे आपल्या हातात आहे.