पालकमंत्री, समाजकल्याण सभापतींमध्ये ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:49+5:302021-01-10T04:18:49+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सदस्यांना दलित वस्ती निधी वाटपावेळी पालकमंत्री सतेज ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सदस्यांना दलित वस्ती निधी वाटपावेळी पालकमंत्री सतेज पाटील आणि सभापती स्वाती सासने यांच्यात मतभेदाची ठिणगी पडली. दरम्यान, हे निधी वाटप अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी यावर शिक्कामोर्तब होईल.
गेले काही दिवस दलित वस्ती निधीवरून सदस्यांमध्ये धुसफूस सुरू होती. जिल्हा परिषदेमध्ये कायमच निधीवरून गोंधळ सुरू झाल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी निधीच्या नियोजनाबाबत जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांना सूचना केल्या. मात्र, सदस्यांनी घाटे यांना लक्ष्य करत त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली.
या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्र्यांनी सभापती स्वाती सासने यांच्यासह सर्व सदस्यांना निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले. यावेळी अशोकराव माने, सरदार मिसाळ, सुभाष सातपुते, महेश चौगुले, मनिषा कुरणे, परवीन पटेल उपस्थित होते. पाटील यांनी या सर्वांशी चर्चा केली आणि पुन्हा नवी यादी तयार करण्याच्या सूचना घाटे यांना दिल्या.
त्यामुळे सभापती सासने, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि घाटे यांनी जिल्हा परिषदेत बसून नव्या यादया तयार केल्या. यामध्ये सासने यांनी काही सदस्यांचा निधी कमी करून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर निधी वाढवून घेतला आणि पुन्हा हे सर्वजण पालकमंत्र्यांना भेटायला गेले.
या बदललेल्या यादीमध्ये सभापती सासने यांनी आपल्या नावावर जादा निधी घेतल्याने त्याला पालकमंत्र्यांनी आक्षेप घेतला. तुम्ही तुमच्याकडे एवढा निधी कसा ठेवून घेता, अशी विचारणा केली. तेव्हा जिल्ह्यातील अनेक गावांतून मागणी केली जाते, यासाठी हा निधी ठेवल्याचे सासने यांनी सांगितले. त्यावर कुणालाही निधी हवा असेल तर माझ्याकडे पाठवा, असे पाटील यांनी सांगितले. मात्र, सासने यांनी यावेळी त्यांचा निधी कमी करण्यास विरोध केला. यातूनच मतभेदाची ठिणगी पडली.
कोट
जिल्हा परिषदेचा सभापती हा जिल्ह्याचा असतो. त्याच्याकडे हक्काने निधी मागण्यासाठी अनेकजण् येत असतात. अशावेळी सभापतींना राखीव निधी ठेवण्याची पध्दत आहे. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांनी याला आक्षेप घेतला आहे. त्यांची ही भूमिका मला मान्य नाही.
स्वाती सासने
सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद