‘कर्नाटक’च्या अरेरावीवरून आंदोलनाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:04 AM2019-11-22T01:04:52+5:302019-11-22T01:05:03+5:30
कोल्हापूर : ऊस परिषद झाल्याशिवाय कारखान्यांनी ऊस तोडण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कारखाना ...
कोल्हापूर : ऊस परिषद झाल्याशिवाय कारखान्यांनी ऊस तोडण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कारखाना व्यवस्थापनाला तशी सूचनाही दिली आहे. काही अपवाद वगळता कारखान्यांकडून तोडीचा कार्यक्रमही थांबविला आहे.
उद्या, शनिवारी होणाऱ्या ऊस परिषदेची जय्यत तयारी सुरू असतानाच गुरुवारी पहाटे कर्नाटकमधील अथणी व व्यंकटेश्वरा या खासगी साखर कारखान्यांकडून ऊस वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे वाहतूक रोखली. काही आक्रमक कार्यकर्त्यांनी तर ट्रॅक्टरलाच आग लावण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर साखरपट्ट्यात ‘स्वाभिमानी’कडून ऊस आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या. परिषदेचा धसका कारखान्यांनी घेतल्याने ज्यांच्या तोडण्या सुरू आहेत, त्यांनीही त्या थांबविण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ऊस परिषदेच्या आधी ऊसपट्ट्यात शांतता जाणवत आहे.
दानोळीत उसाची वाहने पेटविण्याचा प्रयत्न
दानोळी : अथणी कारखान्यास ऊस वाहतूक करीत असलेल्या चार ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या चाकांतील हवा सोडून
वाहने पेटविण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. ही घटना दानोळी येथील जयसिंगपूर मार्गावर गुरुवारी पहाटे घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बुवाचे वाठार (ता. हातकणंगले) परिसरातील कुंभोज-दानोळी मार्गे अथणी कारखान्यास ऊस वाहतूक सुरू होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास दानोळी गावाबाहेरील पेट्रोल पंपाजवळ उभा असलेल्या दोन ट्रॅक्टर तसेच शांतीनगर येथून जात असलेल्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉली रोखून अज्ञातांनी चाकांतील हवा सोडून उसाची वाहने पेटविण्याचा प्रयत्न केला. सध्या ऊसदराची कोंडी फुटली नसल्याने कारखाने बंद असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; पण कर्नाटक सीमाभागातील कारखाने सुरू असून त्यांना महाराष्ट्रातून ऊस पुरवठा केला जात आहे. ऊसदराचा प्रश्न अद्याप मिटलेला नसल्यामुळेच कारखाने केव्हा सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने रोखण्याचे प्रकार सुरू आहेत.
आळते येथे ट्रॅक्टरचे टायर फोडले; ऊस वाहतूक ठप्प
हातकणंगले : आळते येथे गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रेलरचे टायर फोडून ऊस वाहतूक ठप्प केली. यामध्ये ट्रॅक्टरचे एक लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे.
हातकणंगले परिसरामध्ये ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी हातकणंगले-वडगाव रस्त्यावर सेवंथ डे इंग्लिश स्कूल आळतेच्या समोर हा उसाने भरलेला ट्रॅक्टर आला असता अज्ञातांनी आडवून चालकास खाली उतरवून ट्रॅक्टर थांबवला आणि ट्रॅक्टरच्या मागील दोन्ही चाकांचे टायर फोडले. यामध्ये ट्रॅक्टरचे एक लाख ६० हजारांचे नुकसान झाले. उसाने भरलेला ट्रॅक्टर अथणी शुगर या कारखान्याकडे चालला होता. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद काळे करीत आहेत.
साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नाही, त्यामुळे ऊसदर जाहीर केल्याशिवाय तोडणी करू देणार नाही, असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला असून, ऊसदर
जाहीर झाल्याशिवाय धुराडे पेटू देणार नाही, असा इशारादेखील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे. मात्र, तोडण्या सुरू झाल्यामुळे शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.