इचलकरंजीत लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी तुरळक गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:28+5:302021-05-18T04:24:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. सोमवारी लॉकडाऊनच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. सोमवारी लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरातील मुख्य मार्गावर तुरळक गर्दी असल्याचे चित्र होते. पहिल्या दिवशी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; परंतु सोमवारी काही नागरिक विविध कारणांसाठी बाहेर पडले होते. मात्र, दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.
प्रशासनाने १६ ते २३ मेदरम्यान लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सर्व आस्थापना व व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले. औद्योगिक वसाहतींसह सर्वच ठिकाणी निरव शांतता पसरली होती. रविवार (दि.१६) पहिला दिवस, तसेच बाहेर पाऊस पडत असल्याने नागरिकांनी घरीच बसणे पसंद केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी काही प्रमाणात नागरिक शहरातील मुख्य व अंतर्गत रस्यावरून फिरत होते.
वैद्यकीय सेवा व औषध दुकान यांनाच परवानगी देण्यात आली आहे तरीही अनेक कारणे देत काहीजण फिरत होते. मुख्य रस्त्यावर कडक पोलीस बंदोबस्त असल्याने अंतर्गत मार्गावरून नागरिक ये-जा करताना दिसत होते. त्यामुळे प्रशासन कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना त्याकडे दुर्लक्ष करत अनेकांचा दिनक्रम सुरू होता; परंतु दुपारनंतर अनेकजण घरीच राहणे पसंत केल्याने रस्त्यांवर शांतता पसरली होती.
चौकटी
मागणीनुसार पुरवठा
लॉकडाऊनकाळात वैद्यकीय सेवा व औषध दुकानवगळता अन्य आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही काही होलसेल व्यापारी घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार माल पोहोच करत होते.
वस्त्रनगरीचा खडखडाट पूर्णपणे बंद
लॉकडाऊनचा फटका यंत्रमाग व्यवसायालाही बसला आहे. अनेक आस्थापनांसह यंत्रमागही बंद ठेवण्यात आले. औद्योगिक वसाहतींसह शहरातील यंत्रमागांचा खडखडाट पूर्णपणे बंद असल्याने अधिकच शांतता जाणवत होती.