मुख्य मार्गावर तुरळक गर्दी; अंतर्गत रस्ते भरलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:11+5:302021-04-19T04:22:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत दररोज साधारण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत दररोज साधारण दहा ते बारा रुग्ण आढळत होते. मात्र, शनिवारी (दि.१७) एका दिवसात तब्बल चाळीस कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही बाब शहरासाठी नक्कीच चिंताजनक आहे. तरीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता नागरिक नियमांचे पालन न करता रस्त्यावरून फिरत आहेत.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेनची अंमलबजावणी करण्याचे सुरू केले आहे. त्यासाठी १५ ते ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. शासनाच्या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता देत नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. काहीजण मास्क न वापरता मोटारसायकलवरून फिरताना दिसत आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गासह प्रमुख चौकात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
शहरातील अनेक चौकांत विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटारसायकलस्वारांवर कडक कारवाई केली आहे. गावभाग पोलिसांनी गांधी पुतळा परिसरातील तिघाजणांवर संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरीही काही महाभाग शहरातील अंतर्गत रस्त्यावरून व गल्ली बोळातून बिनधास्त फिरत आहेत. रस्त्याकडेला अनेक खेळ खेळले जात आहेत. काहीजण कट्टयावर बसून निवांत गप्पा मारत बसल्याचे चित्र शहरात सर्वत्र पहावयास मिळत आहे. शहरवासीयांनी खबरदारी न घेतल्यास वाढती कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणणे मुश्कील आहे.