‘स्वाभिमानी’साठी मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगावा

By admin | Published: January 26, 2017 12:58 AM2017-01-26T00:58:13+5:302017-01-26T00:58:13+5:30

जिल्हा परिषद निवडणूक : भाजपने लावली जोडणी : शिवसेनेलाही घेतले अंगावर, शेट्टी काँग्रेससोबत गेल्यास भाजप अडचणीत

Speak for 'Swabhimani' to the Chief Minister | ‘स्वाभिमानी’साठी मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगावा

‘स्वाभिमानी’साठी मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगावा

Next

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून रोखण्याची मोर्चेबांधणी सुरू केल्याने खडबडून जागा झालेल्या भाजपने बुधवारी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खासदार राजू शेट्टी यांना फोन करून ‘आघाडीचा विषय फार ताणवू नका,’ असे सांगावे अशा हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु स्वाभिमानी संघटना आता एवढी पुढे गेली आहे की त्यांना भाजपबरोबर जाणे शक्य नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शिवसेनेचीही स्थिती सध्या अशीच असून संपर्क नेते अरुण दूधवडकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर बुधवारी केलेली बोचरी टीका पाहता शिवसेनाही भाजपपासून चार हात लांब गेल्याचे मानण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत जर हे दोन पक्ष विरोधात लढले तर कोल्हापुरातही ही आघाडी होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. शिवसेना-भाजप या युतीची महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रवेशानंतर महाआघाडी बनली. संघटनेने भाजपला ‘विश्वासार्ह मित्रपक्ष’ मानून लोकसभा व विधानसभा त्यांच्यासोबत लढविली; परंतु ताकद वाढल्यानंतर भाजपकडून संघटनेला बेदखल करण्यात येऊ लागले. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही त्याचीच पुनरावृत्ती घडली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक हे आपल्यासोबत आहेत म्हटल्यावर फारशी कुणाची फिकीर केलेली नाही. संघटनेला त्याचा राग आहे. आम्ही मित्रपक्ष असतानाही आम्हाला साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही आणि परस्पर आघाडीचे जागावाटप जाहीर केले गेल्याने संघटनाही आक्रमक झाली. खासदार शेट्टी यांनी हातकणंगले तालुक्यात पारंपरिक विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तिथे शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकरही या आघाडीसोबत आहेत. शेट्टी काँग्रेसच्या सोबत गेले तर ते अडचणीचे ठरू शकेल, असे वाटल्याने मग अचानक बुधवारपासून संघटनेशी वाटाघाटी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आमदार सुरेश हाळवणकर व जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्याशी संपर्क साधला व चर्चा करूया, म्हणून निमंत्रण दिले; परंतु त्यांनी हा विषय आता माझ्या पातळीवर राहिला नसून तुम्ही खासदार शेट्टी यांच्याशीच बोलावे, असे सुचविले परंतु त्यांच्याशी बोलायचे कुणी, याचे कोडे सुटेना म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनीच शेट्टी यांच्याशी बोलून आघाडीबाबतचा विषय संपवावा, असे ठरल्याचे समजते. (प्रतिनिधी)


महाडिक यांचीही नाराजी..
स्वाभिमानी संघटनेला फाट्यावर मारण्याची भाजपची भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनाही आवडलेली नाही. त्यांनीही याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधून संघटनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सुचविल्याचे समजते.
सांगलीतही आघाडी..
खासदार शेट्टी यांनी सांगलीचे काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांच्याशी मंगळवारी आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. तिथेही संघटना व काँग्रेस एकत्रित लढण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Speak for 'Swabhimani' to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.