झाडांशी बोलणारी माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:15 AM2018-10-02T00:15:22+5:302018-10-02T00:15:30+5:30

Speaking people with trees | झाडांशी बोलणारी माणसं

झाडांशी बोलणारी माणसं

googlenewsNext

भारत चव्हाण
रविवारची प्रसन्न सकाळ. हवेत काहीसा उष्मा जाणवत असला तरीही पाण्यावरून येणाऱ्या वाºयाची एक झुळूक मनाला आल्हाद देणारी होती. रंकाळा तलावाच्या आग्नेय दिशेला जुना वाशी नाका परिसरातील शाहू स्मृती उद्यानातील वातावरणात जरा वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. एरव्ही ‘हाय - हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार’ असे शब्द कानावर पडत असत, पण आज मात्र फिरायला येणाºयांमध्ये एक वेगळीच लगबग सुरू होती. कोणी महिला रंगीबेरंगी रांगोळ्या काढत होत्या, कोणी रंगीबेरंगी फुगे लटकावत होती, कोणी फुलांच्या माळा घालत होते, कोणी अल्पोपहार, पाण्याची व्यवस्था करण्यात व्यस्त होते, तर कोणी गायक कराओके ट्रॅक, साउंड सिस्टीम व्यवस्थित लावून घेत होते. कोणी पूजेचा विधी आटोपत होते. सगळी धांदल सुरू असतानाच कोणी तरी म्हणाले, चला आटोपले आता आरती म्हणून घेऊ. सगळे सज्ज झाले समोर कोणता देव नव्हता, कोणी व्यक्ती नव्हती. तरीही आरती सुरू झाली. चांगल्या तीन-चार आरत्याही झाल्या. त्यानंतर ज्याची उत्सुकता होती तो केक कापण्याचा आनंददायी सोहळा सुरू झाला. पाहुण्यांनी केक कापायला सुरुवात केली, तशी साउंड सिस्टीमवर धून वाजायला लागली ......‘हॅपी बर्थ डे टू यू , हॅपी बर्थ डे टू यू डियर’
हा वाढदिवस कोणा व्यक्तीचा, उद्योगपतीचा नव्हता, कोणा राजकारण्याचाही नव्हता, तर तो होता झाडांचा वाढदिवस! हो खरंच झाडांचा! कोल्हापूरकर काय करतील आणि काय नाही याचा नेम नाही. जगावेगळं असं कोल्हापूर आणि येथील माणसं आहेत म्हणूनच काही तरी वेगळं घडत असतं. त्याचं सर्वत्र कौतुक होत असतं. लोक काय म्हणतील ते म्हणू देत..... त्याकडे लक्ष न देता मोहन मतकर नावाच्या एका वृक्षप्रेमीने चार वर्षांपूर्वी एक कार्य हातात घेतलं आणि त्याचं कौतुक म्हणून हा सोहळा झाला. उद्यानात फिरायला येणारा हा अवलिया एके दिवशी हातात चक्क विळा घेऊन यायला लागला. महानगरपालिका उद्यान विभागाने लावलेल्या झाडांना आकार द्यायला लागला. नंतर एके दिवशी त्यांनीही स्वत: झाडं लावली. वर्षभर खत-पाणी घालून त्यांची चांगली देखभाल केली. वर्षभरात ही झाडं चांगली उगवली. नातवाला सोबत घेऊन त्यांनी त्या झाडांचा पहिला वाढदिवस साजरा केला. छोटासा केक कापून झाडाला उदबत्ती ओवाळली. पुढे त्याची चर्चा सर्वदूर झाली. तेव्हा त्यांनी अनेकांना सल्ला दिला. एक झाड दत्तक घ्या आणि वर्षभर त्याची देखभाल करा. त्यांच्या आवाहनास साथ देत गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके धावले. त्यांनी एक वडाचे झाड लावले आणि त्याची वर्षभर देखभाल केली. मनुष्य हा अनुकरणप्रिय आहे याचा अनुभव या ठिकाणी आला. अनेकजण झाडे लावण्यास पुढे आले. आज ४०० झाडं या उद्यानात लावली गेली आहेत, आणि चांगल्या पद्धतीने जगवली आहेत. एक साधा उपक्रम चार वर्षांत किती गतीने पुढे जाऊ शकतो, चांगल्या कामाला किती प्रतिसाद मिळू शकतो याचे हे उत्तम उदाहरण!
महानगरपालिका प्रशासनाने शहरात नागरिकांना ५४ सार्वजनिक उद्यानांची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यावर मालकी शहरवासीयांची आहे. महापालिका एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा जेव्हा काही कारणांनी कमी पडते, तेव्हा मोहन मतकरांसारखी वेडी माणसं पुढे येतात आणि आपलं कार्य हातात घेतात. कोणाला दोष देत न बसता समाजाला प्रोत्साहित करतात आणि आपलं कार्य पुढे नेतात, कोणाच्याही सहकार्याशिवाय! समाजात अशा वेड्या माणसांमुळेच बदल घडत असतो. आज ज्यांनी ज्यांनी झाडं लावली आहेत, ही माणसं रोज त्या झाडाजवळ जाऊन त्यांची विचारपूस करतात. देखभाल करतात. चक्क संवाद साधतात; त्यामुळे झाडांची भाषा त्यांना कळायला लागली आहे. दोघांचं मैत्रीचं नातं घट्ट बनलंय. म्हणूनच कुटुंबातील एखाद्या सदस्याचा वाढदिवस जितक्या उत्साहात साजरा करतो, तितक्याच उत्साहाने झाडांचा वाढदिवस साजरा केला जातोय. ही गोष्ट खरोखरीच अभिनंदनीय, प्रेरणादायी आणि अनुकरणीय देखील आहे; त्यामुळे निसर्गाबद्दलची ओढ अधिक तीव्र होण्यास मदत होणार आहे. मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटतेय ते असं की ... सार्वजनिक उद्यानांची, पर्यावरणाची देखभाल राखणं हे आपलंही एक कर्तव्य आहे हा एक चांगला संदेश यातून देण्यात आलाय. समाजातील ही सजगता उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो ही अपेक्षा !

Web Title: Speaking people with trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.