सीपीआरसाठी विशेष कृती आराखडाच हवा

By Admin | Published: February 29, 2016 01:05 AM2016-02-29T01:05:09+5:302016-02-29T01:08:43+5:30

शहरवासीयांची मागणी : राजकीय इच्छाशक्तीची गरज ; रूपडे पालटण्यासाठी ५० कोटींची गरज

Special Action Plan for CPR | सीपीआरसाठी विशेष कृती आराखडाच हवा

सीपीआरसाठी विशेष कृती आराखडाच हवा

googlenewsNext

कोल्हापूर : कालबाह्य झालेली यंत्रसामग्री, व्हेंटिलेटरची कमतरता आणि वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे अपुऱ्या पडत असलेल्या बेडमुळे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) रूपडे पालटण्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा राज्य सरकारने विशेष कृती आराखडा करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सीपीआर अधिक सक्षम होण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
‘गरिबांचे आधारवड व जिल्ह्याची आरोग्यवाहिनी’ असलेल्या सीपीआरमध्ये रोज कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यामधून रुग्ण येतात. विशेषत : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी माजी आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या काळात या रुग्णालयात यंत्रसामग्री आल्या. रुग्णालयात सध्या १३ व्हेंटिलेटरपैकी तीन सुरू व डायलेसिस मशीन बंदमुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. त्याचबरोबर कालबाह्य झालेल्या काही यंत्रसामग्री, त्या यंत्रसामग्रीवर होणारा दुरुस्तीचा खर्च व अतिदक्षता विभागामधील बेडची अपुरी संख्या अशा समस्या आहेत. राज्य शासनाने सीटी स्कॅनसाठी सुमारे सहा कोटी रुपये मंजूर केले; पण अद्यापही सीपीआरमध्ये सीटी स्कॅन मशीन आलेले नाही. सीटी स्कॅनच्या प्रतीक्षेत शहरवासीय आहेत. हे मशीन मे-जूनपर्यंत येईल,असे सांगितले जाते.

रुग्णांना दिलासा...
सीपीआरमध्ये यापूर्वी हृदयशस्त्रक्रिया विभागासाठी अ‍ॅन्जिओग्राफी करण्यासाठी सहा हजार रुपये द्यावे लागत होते. मात्र, खासगी रुग्णालयात याचा दर तीन हजार रुपये होता. दोन महिन्यांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तीन हजार रुपये दर करून एकप्रकारे सर्वसामान्यांना दिलासा दिला.

भविष्याचा विचार करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे विशेष कृती आराखड्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. जेणेकरून, रुग्णांना सर्व सुविधा मिळतील.
- वसंतराव मुळीक, निमंत्रक, सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समिती, कोल्हापूर.

Web Title: Special Action Plan for CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.