कानडी मातृभाषिक मुलांसाठी विशेष उपक्रम !
By admin | Published: June 18, 2015 12:05 AM2015-06-18T00:05:13+5:302015-06-18T00:39:46+5:30
‘मराठी’ समृद्धीचा प्रयत्न : ‘गडहिंग्लज’मध्ये २६ शाळेत प्रयोग
राम मगदूम - गडहिंग्लज -मातृभाषा ‘कानडी’ असणाऱ्या मुलांना शाळेची गोडी लागावी व त्यांची ‘मराठी’ भाषा समृद्ध व्हावी यासाठी यंदापासून गडहिंग्लज तालुक्यात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. २० खेड्यांतील २६ शाळंमध्ये ‘मराठी’च्या विकासासाठी सीमाभागात राबविला जाणारा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील निम्मे लोक कानडी बोलतात. किंबहुना ‘गडहिंग्लज’च्या पूर्वेकडील लोकांची मातृभाषा ही कानडीच आहे. त्यामुळेच या परिसरातील नवागत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावण्याचे आव्हान शिक्षण खात्यासमोर कायम राहिले आहे.
साधारणपणे तालुक्यातील सीमावर्ती खेड्यातील शिक्षकांना अध्यापनावेळी ही भाषिक अडचण भेडसावते. अशा २० खेड्यांतील २६ शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे मिळून ३२०० विद्यार्थी शिकतात. त्यापैकी अप्रगत विद्यार्थींची संख्या १० टक्के म्हणजेच तब्बल ३२० इतकी आहे. त्यांना मराठी लिहिता-वाचता येत नाही. त्याची कारणमीमांसा केल्यानंतर ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. त्यावर उपाय म्हणूनच या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
असा सूचला उपक्रम
डॉ. जी. बी. कमळकर ‘गशिअ’ म्हणून गडहिंग्लजला वर्षापूर्वी रूजू झाले. शाळा भेटीच्यावेळी सीमाभागातील ही भाषिक अडचण त्यांच्या निदर्शनास आली. यासंदर्भात संबंधित शिक्षकांची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यातून या उपक्रमाची कल्पना पुढे आली आहे.
‘अप्रगत’चा शिक्का पुसणार
कानडी बोलणारी मुलं मराठी शाळेत आल्यानंतर गोंधळून जातात. मुलांची भाषा शिक्षकांना, शिक्षकांची भाषा मुलांना समजत नाही. यासाठी सुरूवातीला काही दिवस मराठीतील अवघड शब्दांचा अर्थ कानडीतून समजावला जाईल. त्यानंतर मराठीवर प्रभुत्व येण्यासाठी खास प्रयत्न केले जातील. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होऊन ‘अप्रगत’चा शिक्का कायमचा पुसला जाईल.
५उपाययोजना काय ?
पहिल्या वर्गाला शिकविण्यासाठी कानडी भाषा समजणाऱ्या ४० शिक्षकांची नेमणूक.
पहिलीच्या वर्गाला शिकविण्याचा हातखंडा असणाऱ्या आजी-माजी शिक्षकांबरोबरच मराठी भाषा तज्ज्ञांची मदत घेणार
प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख मिळून पाचजण २६ शाळा दत्तक घेणार.