नेत्यांनो, चॅलेंज कोल्हापूरच्या प्रश्नांना द्या, सत्तेसाठी राजारामची बदनामी नको!
By विश्वास पाटील | Published: April 16, 2023 10:32 AM2023-04-16T10:32:05+5:302023-04-16T10:36:15+5:30
कोणते प्रश्न सोडवणार हे बिंदूचौकात येऊन जाहीर करा!
विश्वास पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: एका साखर कारखान्याच्या सत्तेसाठी माजी मंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा गट परस्परांना चॅलेंज देवून चक्क बिंदू चौकात आले. शड्डू ठोकून एकमेकांना आव्हान दिले..कोण भ्याले म्हणाले तर कोण पळाले म्हणाले..परंतू यातून कोल्हापूरचा नांवलौकिक धुळीला मिळाला... नेत्यांनो, तुम्हांला चॅलेंजच द्यायचे असेल तर कोल्हापूरच्या प्रश्र्नांना द्या..तिथे तुमची ताकद दाखवा..त्यातून तुमच्यासह जनतेचेही भले होईल...!
कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २३ एप्रिलला होत आहे. त्याचा प्रचार करण्यासाठी अजून तब्बल आठवडा हातात आहे. गेल्या पंधरवड्यापासून दोन्ही गटाकडून सभा,प्रचार मेळावे सुरु आहेत. त्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपातून कोल्हापूरच्या जनतेची करमणूक होत आहे. निवडणूक एका कारखान्याची असो की लोकसभेची. तिथे प्रचाराची पातळी किती खालीपर्यंत न्यायची याचे भान ती लढवणाऱ्यांनीच बाळगले पाहिजे. परंतू शुक्रवारी तसे घडले नाही. नेतेच बिंदू चौकात येवून एकमेकांची गळपट्टी धरायची भाषा करू लागल्यावर त्याचे लोण गावपातळीवर पोहोचायला वेळ लागत नाही. त्यातून गावोगावी तणाव निर्माण होणार आहे. सहकारी साखर कारखानदारीपुढे आज अनेक अडचणी आहेत. एकाबाजूला केंद्र सरकार एफआरपी वाढवत आहे आणि साखरेची किमान विक्री किंमतही वाढवायला तयार नाही. दोन्ही गट आता निवडणूकीवरच एवढी पैशाची उधळण करू लागल्यावर त्यातून कारखान्याचा कारभार किती पारदर्शक होणार याची भिती सभासदांच्या मनांत आताच तयार होवू लागली आहे.
सतेज पाटील असोत की महाडिक गट, जिल्ह्याच्या राजकारणात तुमची दोघांचीही स्वतंत्र राजकीय ताकद आहे. ही ताकद एकवटली असती तर त्यातून जिल्ह्याला अजून चांगले वळण लागले असते परंतू ती शक्यता सध्यातरी दिसत नाही. राजकारणात विरोधक असला तरी तुम्ही एकमेकांचे वैरी नाही. शुक्रवारचा व्यवहार तसाच होता. माजी मंत्री पाटील यांचे कोल्हापूरच नव्हे तर राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान तयार होत आहे. पक्षही त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे राजकारण जिल्ह्यापुरते मर्यादित होते. परंतू खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने चांगली संधी दिली आहे. त्यांनाही भविष्यात चांगल्या संधी आहेत. असे असताना तुम्ही दोघेही वैरत्वाच्या बेड्या पायात घालून स्वत:चे राजकीय भवितव्य एका कारखान्यापुरते, जिल्ह्यापुरते मर्यादित करू नका.
कोल्हापूरचे असे कितीतरी प्रश्र्न आहेत, त्यांची सोडवणूक कित्येक दिवसांपासून होता होत नाही. सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनसाठी आमदारकी पणाला लावली..विलंबाने का होईना परंतू तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे. खासदार महाडिक यांनी बास्केट ब्रिजचा प्रकल्प स्वप्न म्हणून हातात घेतला..त्याचे भूमिपूजन झाले परंतू तो प्रत्यक्षात येण्यासाठी अजून बरीच राजकीय ताकद लावावी लागणार आहे. या दोन प्रश्नांप्रमाणेच कोल्हापूरची हद्दवाढ रखडली आहे. सर्किट बेंचच्या प्रश्र्नांत कोल्हापूरचा नुसता फुटबॉल झाला आहे. न्याय यंत्रणा म्हणते सरकारकडे जावा, सरकार म्हणते मुख्य न्यायाधिशांना भेटू या... कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलाचे तर बारा वाजले आहेत. कोल्हापूरात सरकारी मालकीचा एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव नाही. अंबाबाईच्या विकास रखडला आहे. साधे ताराबाई रोडवरील यात्री निवास आपल्याला कित्येक वर्षे उभे करता आलेले नाही. पंचगंगा प्रदूषणाच्या व नदीत जलपर्णी वाढल्याच्या बातम्या छापून दैनिके थकलीत तरी त्या प्रश्र्नाची तड लागलेली नाही..विमानतळाचे कांही प्रश्र्न सुटले तरी अजूनही बरेचसे आहेत. शाहुपुरीतून राजारामपुरीला जोडणारा एक उड्डाण पूल आपल्याला करता आलेला नाही. तुम्ही कोल्हापूरचे नेते म्हणून या प्रश्र्नांचे घ्या चॅलेंज..एकाने थेट पाईपलाईन केली..दुसरा बास्केट ब्रिज करत आहे..तसेच राहिलेल्या प्रश्र्नांतही करा विभागणी..ते प्रश्र्न कधी सोडवणार त्याचे डिजीटल करून लावा बिंदू चौकात..आता उरले दोन तासनुसार..आता उरले दोन वर्षे..अशी प्रश्र्न सोडवणूकीची तारीख करा जाहीर...मग बघा, कोल्हापूरची जनता तुम्हांला डोक्यावर घेवून खऱ्या अर्थाने नाचेल..मग कुणालाच खांद्यावर बसून शड्डू ठोकायला जावे लागणार नाही..
बदनामी तुमच्यामुळे...
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीतील निम्मी आता खासगी झाली आहे. त्या निम्म्यातीलही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कारखाने आर्थिकदृष्टया भक्कम आहेत. अगोदरच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी भ्रष्टाचाराने बदनाम आहे. त्यात तुम्ही असे शड्डू ठोकायला लागल्यावर त्यातून कारखानदारीची अधिकच बेअब्रू होणार आहे. तुम्हांला नांवलौकिक वाढवता आला नाही तर किमान तिची बदनामी तरी होवू देवू नका...
परंपरा कुणाची..?
राजर्षि शाहू महाराज यांच्या कर्तत्वाचे रक्ताचे वारसदार असलेले छत्रपती राजाराम महाराज यांनी या कारखान्याचा पाया १९३२ ला घातला. तेव्हा देशात फक्त २९ कारखाने होते. महाराष्ट्रातील ही हा पहिलाच कारखाना. ऊसाचे मळे व रेल्वे स्टेशन डोळ्यासमोर अत्यंत दूरदृष्टीने राजाराम महाराजांनी हा कारखाना उभा केला. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादांनी तो सहकारी केला. भगवानराव पवार यांची धडपड त्यासाठी कारणीभूत ठरली. ज्यांनी काल शड्डू ठोकले त्या दोघांच्याही घराण्याचा तसा या कारखान्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. थेट छत्रपती घराण्याने उभारलेला हा कारखाना आहे..शाहू महाराजांचा जप करणाऱ्यांनी याचेही भान बाळगण्याची गरज आहे.