स्थलांतरित कामगारांवर विशेष लक्ष
By admin | Published: January 2, 2015 11:32 PM2015-01-02T23:32:22+5:302015-01-03T00:12:57+5:30
‘ईएलएम’ कार्यक्रम : राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्थेचा उपक्रम; जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत घट
गणेश शिंदे : कोल्हापूर जिल्ह्यातील एडस्च्या रुग्णांचा टक्का गेल्या काही वर्षांमध्ये घटू लागला आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून होणारी जनजागृती कारणीभूत ठरली आहे. आता जिल्ह्याची ‘एडस्’च्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्था, लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्पांतर्गत ‘ईएलएम’ (इम्प्लॉयर लीड मॉडेल) हा कार्यक्रम राबविणार आहे. या माध्यमातून स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
२०१० पासून लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प राबविण्यात येत आहे. गतवर्षी ऊसतोड मजुरांसाठी हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला होता. यावर्षी स्थलांतरित कामगार व ट्रकचालकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून यासाठी जिल्ह्यातील उद्योजक, विविध कंपन्यांंनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र एडस् नियंत्रण संस्थेने केले आहे. राज्यात औरंगाबाद, सातारा, रायगड, नाशिक, बुलढाणा व चंद्रपूर या जिल्ह्यांत ‘ईएलएम’हा कार्यक्रम सुरू झाला आहे. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात जिल्हा एडस् नियंत्रण कार्यालय आहे. ‘ईएलएम’साठी सध्या लोटस हॉस्पिटल, मुस्लिम समाज प्रबोधन संस्था व युवा विकास या संस्था विविध ठिकाणी काम करीत आहेत. त्याचबरोबर शिरोळ मोटार मालक संघ मदत करणार आहे. यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकरसह सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.
स्थानिक कंपन्यांचा सहभाग आवश्यक
जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकितसह इचलकरंजीतील खंजिरे औद्योगिक वसाहत, इचलकरंजी इस्टेट, त्याचबरोबर जयसिंगपूरमधील औद्योगिक वसाहत, आदी वसाहतींमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कामगारांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेचा वापर करून ‘ईएलएम’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा औद्योगिक, शैक्षणिक विकास झपाट्याने होत आहे. जिल्ह्यात बांधकाम वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांत कुशल,
अकुशल कामगारांची मागणी आहे. उसाच्या गळीत हंगामाच्या काळात बीड, लातूर, उस्मानाबाद, आदी जिल्ह्यांमधून मोठ्या
संख्येने ऊसतोड मजूर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. सध्या विविध कारणांनी जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या कामगारांची संख्या सुमारे दीडलाख आहे. त्यांपैकी सुमारे ५० हजारांवर या कार्यक्रमांतर्गत लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.
शुन्य गाठायचे आहे...
एडस्च्या प्रसारात जे काही प्रमुख घटक कारणीभूत आहेत, त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा घटक स्थलांतरित कामगार असल्याचा निष्कर्ष केंद्र, राज्य तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यासातून पुढे आला आहे. त्यामुळेच एडस्चा फैलाव रोखण्यासाठी स्थलांतरित कामगारांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.
जिल्ह्यात दहा हजार ट्रकचालक
दळणवळणाच्या माध्यमातून जिल्ह्यात दहा ते पंधरा हजार ट्रकचालक ये-जा करतात. एडस्च्या संक्रमणामध्ये ट्रकचालक हादेखील एक महत्त्वाचा घटक असल्याचे विविध अभ्यासांतून पुढे आले आहे. एडस्चा धोका टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याची माहिती किंवा चुकीच्या माहितीमुळे अनेक ट्रकचालक एडस्ची शिकार झाले आहेत. यामुळे ट्रकचालकांमुळे जनजागृती करण्यात येणार आहे. सुमारे पाच हजार ट्रकचालकांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.
‘शून्य गाठायचे आहे’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘ईएलएम’ हा कार्यक्रम राबविणार आहे. काही कंपन्यांनी याला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. त्यामुळे या महिन्यात कार्यक्रमास सुरुवात होईल.
- जगदीश पाटील, प्रादेशिक कार्यक्रम अधिकारी, राज्य एडस् नियंत्रण संस्था