बांधकाम भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष कॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:42 AM2021-02-18T04:42:22+5:302021-02-18T04:42:22+5:30
कोल्हापूर : नागरिकांना आता भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांनाही विनंती करावी लागणार नाही, तसेच वारंवार हेलपाटेही मारावे लागणार नाहीत. कारण ...
कोल्हापूर : नागरिकांना आता भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांनाही विनंती करावी लागणार नाही, तसेच वारंवार हेलपाटेही मारावे लागणार नाहीत. कारण महानगरपालिका नगररचना विभागामार्फत दि. २३ व दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत नागरिकांना बांधकाम भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नगररचना विभागाशी ज्या नागरिक, व्यावसायिक यांनी बांधकाम भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज दिलेले आहेत. त्यांनी नगररचना विभागामध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आवश्यक असलेले शुल्क भरावे व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळविणे नागरिकांना फार जिकिरीचे होऊन जाते. अर्ज दिल्यानंतर सर्व्हेअर, संबंधित अभियंता जागेवर पाहणी करण्यास लवकर येत नाहीत. त्यासाठी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला तर ते भेटतही नाहीत. त्यामुळे वारंवार हेलपाटेही मारावे लागतात. एकेक वर्ष भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यात जातो. शिवाय फाइल गहाळ होण्याचेही प्रमाण जास्त आहे. अनेक वेळा नागरिकांना दुसऱ्यांदा फाइल देण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे या कटकटीतून आता नागरिकांना सुटका मिळणार आहे. कारण दोन दिवसांत सर्वच अधिकारी या शिबिरात उपस्थित राहून आपली प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.