पन्हाळ्यातील लाईट अँड साउंडसाठी १२ कोटींचा विशेष निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:38+5:302021-07-16T04:17:38+5:30
पन्हाळा : पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने सादर होणाऱ्या ध्वनी आणि प्रकाश (लाईट ॲन्ड साऊंड) योजना नव्याने सादर होणार आहे. ...
पन्हाळा :
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने सादर होणाऱ्या ध्वनी आणि प्रकाश (लाईट ॲन्ड साऊंड) योजना नव्याने सादर होणार आहे. पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी लागणारा निधी मंजूर केल्याचे नगराध्यक्षा रुपाली धडेल व मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी सांगितले. बारा कोटी रुपयांच्या या योजनेसाठी शासनाची तांत्रिक मान्यता मिळाली असून येत्या महिन्याभरात याचे काम सुरु होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली .
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पन्हाळ्यावरील इतिहास लाईट ॲन्ड साऊंड सिस्टीम माध्यमातून थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे मांडला जाणार आहे. यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आवाज देणार आहेत. तर तांत्रिक सहाय्य कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे करणार आहेत .
पन्हाळा गडाला सिद्धीजौहरचा पढलेला वेढा, शिवाजीराजांची पन्हाळा ते विशाळगडाची दौड, वीर शिवा काशिद यांचा प्रसंग व त्यांचे बलिदान व विशाळगडाच्या पायथ्याशी वीर बाजीप्रभू-फुलाजीप्रभू यांची झालेली लढाई असा साठ मिनिटांचा हा प्रसंग थ्री डी या आधुनिक तंत्रज्ञानातून मांडण्यात येणार असून त्या काळात पडणारा पाऊस आणि लढाईतील उडणारे रक्त आपल्या अंगावरच उडते असा भास या नव्या तंत्रज्ञानातून पहायला व अनुभवायला मिळणार आहे. सुरुवातीला ही योजना धान्य कोठार परिसरात लेसर शो द्वारे साकारणार होती पण येथील पुरातत्व व छत्रपती ट्रस्ट यांची परवानगी मिळणे कठीण झाल्याने आता हा शो इंटरप्रिटेशन हॉल मध्ये साकारणार आहे. या योजनेसाठी शासनाकडून चार कोटी रुपये मंजूर झाले होते. ते सध्या नगरपरिषदेकडे असून यासाठी सुधारित बारा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे जून महिन्यात सादर केला आहे. पालकमंत्री सतेज पाटील व माजी मंत्री डॉ. विनय कोरे तांत्रिक मान्यतेसाठी पाठपुरावा करत आहेत. पुणे येथील वैष्णवी इलेक्ट्रॉनिक कंपनी याचे डिझाईन तयार करत असून आंतरराष्ट्रीय गार्डियन कंपनी हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा करणार आहे. ऐतिहासिक बारकाव्यासाठी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. प्रा. जयसिंग पवार, डॉ. अमर अडके आदी करणार आहेत. इतिहासकालीन वातावरण निर्माण करुन पन्हाळा शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर लाईट ॲन्ड साऊंड सिस्टीमद्वारे पोहोचेल असे नगराध्यक्षा धडेल यांनी सांगितले.
१५ पन्हाळा
फोटो : पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांचेबरोबर नगराध्यक्षा रुपाली धडेल, रवींद्र धडेल, नगरसेविका यास्मिन मुजावर व मान्यवर.