शिवाजी विद्यापीठात कुलगुरूंच्या हस्ते परुळेकर, पाटील यांचा विशेष गौरव
By admin | Published: April 1, 2017 07:10 PM2017-04-01T19:10:42+5:302017-04-01T19:10:42+5:30
एकाच वेळी दोन विद्यार्थिनींची निवड कौतुकास्पद : डॉ. देवानंद शिंदे
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : राज्य युवा पुरस्कारांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकाच वेळी दोन विद्यार्थिनींची निवड होणे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने राज्य युवा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्वेता परुळेकर आणि प्रियांका पाटील या विद्यार्थिनींचा शनिवारी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, युवकांच्या तुलनेत युवती कोठेही तसूभरही कमी नाहीत, हे या विद्यार्थिनींनी दाखवून देत युवा पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. त्यांची ही कामगिरी विद्यापीठातील अन्य विद्यार्थिनींसाठीही आदर्शवत अशा प्रकारची आहे.
यावेळी कुलगुरूंच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आदी उपस्थित होते.