गणपूर्तीअभावी विशेष सभा रद्द

By admin | Published: November 8, 2015 12:20 AM2015-11-08T00:20:34+5:302015-11-08T00:37:13+5:30

इचलकरंजी नगरपालिका : काँग्रेस-शहर विकास आघाडीतील कुरघोडीचे राजकारण

Special meeting cancellation due to absence of nomination | गणपूर्तीअभावी विशेष सभा रद्द

गणपूर्तीअभावी विशेष सभा रद्द

Next

इचलकरंजी : पुढील काळातील पाणीटंचाईच्या नियोजनार्थ आयोजित विशेष सभेकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जांभळे गटाचे सदस्य न फिरकल्याने शनिवारी होणारी इचलकरंजी पालिकेची विशेष सभा गणपूर्तीअभावी रद्द झाली. जनतेच्या जिव्हाळ्याचे अत्यंत महत्त्वाचे विषय असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीचे
सदस्य सभेला गैरहजर राहिले यासारखे दुर्दैव नाही असे सांगत शहर विकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध नोंदविला, तर महत्त्वाचे अनेक
विषय असताना काहीतरी करीत असल्याचा आव आणून आघाडीकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.
पुढे येणाऱ्या उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे या प्रमुख विषयासह अन्य ११ विषयांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, काँग्रेसच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत या बैठकीस कोणत्याही सदस्याने हजर न राहण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. तसा पक्षादेश (व्हिप) पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी सर्व सदस्यांना बजावला. त्यामुळे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनीही पक्षादेशाचे नाइलाजास्तव पालन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील जांभळे गटाच्या सदस्यांना पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी तोंडी व्हिप बजावला होता. शनिवारी सकाळी ११.१५ वाजता
शहर विकास आघाडीचे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस मदन कारंडे गटाचे तीन मिळून १९ सदस्य सभागृहात उपस्थित होते. अर्धा तास उलटल्यानंतर अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी गणपूर्तीअभावी ही विशेष सभा रद्द केली जात असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी पक्षप्रतोद अजितमामा जाधव यांनी महत्त्वाचे विषय असतानाही संबंधित खात्याचे अनेक अधिकारी गैरहजर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. (वार्ताहर)
आघाडीकडून नाटकबाजी : सुनील पाटील
काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न असतानाही आम्हाला विश्वासात न घेता विषयपत्रिका काढली गेली. आपण काहीतरी जनतेसाठी करतो असा आव आणत आघाडीकडून केवळ प्रसिद्धीसाठी नाटक केले जात आहे. आपल्या सोयीनुसार ते विषय घेत असल्यानेच सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यावेळी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, आदी उपस्थित होते.
मला कोंडीत पकडण्याची खेळी : शुभांगी बिरंजे
नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे म्हणाल्या, मी काँग्रेस पक्षाचीच नगराध्यक्षा असून, महत्त्वपूर्ण विषयांवरच सभा बोलविली होती, व्हिप लागू करून मला कोंडीत पकडण्याचा डाव केला जात आहे. व्हिप हे एकमात्र हत्यार त्यांच्याकडे आहे. चांगल्या कामात सहकार्याऐवजी मला अडचणीत आणण्याचा हा दुबळेपणा आहे. बिनबुडाचे आरोप होत असतील तर जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचा इशाराही बिरंजे यांनी दिला.
यासारखे दुर्दैव नाही : अजितमामा जाधव
आरोग्य, पाणी, पालिका कर्मचारी, शिक्षण मंडळ शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, पाणीटंचाई असे महत्त्वाचे विषय असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीतील सदस्य गैरहजर राहिले. केवळ व्हिप लागू केल्यामुळेच ही सभा रद्द झाल्याचे सांगून आघाडीचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव म्हणाले, एकीकडे जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करीत दुसरीकडे त्यामध्ये अडथळे निर्माण केले जातात. याची प्रचिती यापूर्वीही अनेकदा आलेली आहे. कॉँग्रेस नेते प्रकाश आवाडे यांनी पाण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी सभा घेण्याची मागणी करण्याची सूचना आपल्या नगरसेवकांना केली होती. यावेळी तानाजी पोवार, मदन झोरे, विठ्ठल चोपडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Special meeting cancellation due to absence of nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.