इचलकरंजी पालिकेतील विशेष सभा बेकायदेशीर- शशांक बावचकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 01:02 AM2018-06-16T01:02:19+5:302018-06-16T01:02:19+5:30
घरफाळा कपात आणि कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलणे अशा महत्त्वाच्या विषयांवर नगराध्यक्ष अॅड. अलका स्वामी यांनी सोमवारी (दि.१८) विशेष सभा आयोजित केली आहे. मात्र, दोन्ही विषयांच्या फाईल्स तयार नसल्याने सभा
इचलकरंजी : घरफाळा कपात आणि कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलणे अशा महत्त्वाच्या विषयांवर नगराध्यक्ष अॅड. अलका स्वामी यांनी सोमवारी (दि.१८) विशेष सभा आयोजित केली आहे. मात्र, दोन्ही विषयांच्या फाईल्स तयार नसल्याने सभा बेकायदेशीर ठरणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी दिली.
नगरपालिका हद्दीतील सुमारे ५१ हजार मालमत्तांवर अवाजवी व अन्यायी घरफाळा वाढ झाली असल्यामुळे ती कमी करण्यात यावी, अशा आशयाच्या विषयावर मागील वर्षी १० आॅक्टोबर २०१७ ला झालेल्या सभेत घरफाळ्यामध्ये दहा टक्के कपात करण्यात यावी आणि ही कपात एप्रिल २०१८ पासून लागू करावी, असा प्रस्ताव पालिकेच्या सभेत संमत करण्यात आला होता. सभेसाठी उपस्थित असलेले मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला नव्हता; पण त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी १५ मार्च २०१८ रोजी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे घरफाळा कमी करण्याच्या प्रस्तावास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. त्याचा परिणाम म्हणून पालिकेच्या उत्पन्नात ३.४० कोटी रुपये घट होणार असल्याचे सांगत घरफाळा कमी करण्याचा प्रस्ताव रद्दबातल ठरविला.
जिल्हाधिकाºयांनी घरफाळा रद्द करण्याचा आदेश २२ मार्च २०१८ रोजी दिला असला तरी त्या आदेशाची प्रत नगराध्यक्षांना मिळालेली नाही. याबाबत सत्तारूढ व विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १४) सत्तारूढ भाजप, ताराराणी व राष्टÑवादी यांच्या आघाडीने नगराध्यक्षांकडे घरफाळा कपात करण्याच्या विषयावर विशेष सभा बोलविण्याची मागणी केली. त्यास अनुसरून नगराध्यक्षांनी सोमवारी सभा आयोजित केली, पण या विषयाची फाईल अद्यापही कार्यालयाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती बावचकर यांनी दिली.
२७ कोटींचा प्रस्ताव विलंबामुळे ३५ कोटी
कृष्णा नळ योजनेकडील दाबनलिका व पंप बदलण्यासाठी चार वर्षांपूर्वी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला होता. मात्र, वारणा नळ योजना मंजूर झाल्यामुळे हा प्रस्ताव शासनानेच रद्दबातल ठरविला. आता वारणा योजनेस होणाºया विरोधामुळे होणारा विलंब पाहता गळकी झालेल्या कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलणे व पंपांची क्षमता वाढविण्यासाठी नवीन पंप घेणे असा प्रस्ताव दिला जाणार आहे. हा प्रस्ताव सुमारे ३५ कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.