राजकीय खेळीमुळे पालिकेची विशेष सभा रद्द
By admin | Published: November 6, 2015 11:58 PM2015-11-06T23:58:54+5:302015-11-07T00:20:36+5:30
काँग्रेस व ‘शविआ’मध्ये कुरघोडीचे राजकारण : इचलकरंजी पालिकेतील घडामोडींवर नगराध्यक्षांवरील अविश्वासाचे सावट
इचलकरंजी : नगराध्यक्षांनी विश्वासात न घेता आज, शनिवारची विशेष सभा बोलावल्यामुळे बहिष्कार टाकून सभाच रद्द करण्याचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसकडून घेण्यात आला. परिणामी, कॉँग्रेस विरुद्ध शहर विकास आघाडी यांच्यातील राजकीय खेळी रंगण्याची चिन्हे आहेत. या राजकीय खेळीवर नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या पार्श्वभूमीचेही सावट आहे.
नगरपालिकेत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११, तर शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेत आहे. सत्तेतील वाटणीप्रमाणे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व दोन सभापती कॉँग्रेसकडे व दोन सभापती राष्ट्रवादीकडे आहेत. पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे जानेवारीमध्ये शुभांगी बिरंजे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले. त्यांना ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. परिणामी, ३६ विरुद्ध २१ अशी बलाबलाची स्थिती असली तरी नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्यासाठी ४३ असणारी संख्या होत नसल्याने त्यावेळी कॉँग्रेसने काहीसे नमते घेतले.
गेल्या दहा महिन्यांत शहर विकास आघाडी व नगराध्यक्षांकडून कॉँग्रेसच्या नगरसेवक-नगरसेविकांवर अन्याय होत आहे. त्यांच्या प्रभागांतील विकासकामे डावलली जात आहेत. त्यामुळे कॉँग्रेसमधील नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आठवड्यापूर्वी कॉँग्रेस नगरसेवकांची बैठक होऊन त्या बैठकीत आयजीएम हॉस्पिटलचे शासनाकडे हस्तांतरण, काळम्मावाडी धरणातून थेट पाणी योजना, नवीन भुयारी गटार योजना अशा नागरी हिताच्या विषयांवर विशेष सभा बोलविण्याचे ठरले होते. तसेच दीपावलीनंतर नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचेही निश्चित केले होते. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा बिरंजे यांनी आज सकाळी सव्वाअकरा वाजता विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, सभेमधील विषय विश्वासात न घेता आणि संबंधित समित्यांमार्फत न आणता थेट सभेसमोर नगराध्यक्षांनी ठेवले आहेत. त्यामुळे आजच्या विशेष सभेसाठी नगरसेवकांनी अनुपस्थित राहण्याचे शुक्रवारच्या कॉँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत ठरविण्यात आले. त्यासाठी पक्षादेश (व्हिप) लागू करणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी दिली. त्याचप्रमाणे या विशेष सभेसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकसुद्धा उपस्थित राहणार नाहीत, अशीही माहिती पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी दिली. (प्रतिनिधी)
काँग्रेस व ‘शविआ’ यांच्यात कलगीतुरा रंगणार
४नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावरील अविश्वास आणण्यापूर्वी आयजीएम, काळम्मावाडी नळ योजना, भुयारी गटार, तसेच रस्त्याचे विशेष अनुदान, आदी जनहिताच्या विषयांवर विशेष सभा बोलविण्यासाठी नगराध्यक्षांकडे यादी देण्याचे कॉँग्रेसने ठरविले.
४शनिवारची विशेष सभा बोलावून शहर विकास आघाडीने कॉँग्रेसवर कुरघोडी केली. आजची सभा रद्द झाल्यानंतर पुन्हा दोन महिने सभा बोलविली नाही तरीसुद्धा चालते.
४दीपावलीनंतर कॉँग्रेस व शहर विकास आघाडी यांच्यात आणखीन राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.