अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती

By admin | Published: February 9, 2016 12:44 AM2016-02-09T00:44:48+5:302016-02-09T00:45:13+5:30

प्रस्तावावरील धूळ झटकली : २५५ कोटींपैकी ७२ कोटी पुढील महिन्यात येणार; अंतिम मान्यतेसाठी टिप्पणी करणे सुरु

Speed ​​of Ambabai Pilgrimage Development Plan | अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती

Next

कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविक श्रद्धेने ज्या देवीच्या चरणी लीन होतात, त्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामास गती मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या विकास आराखड्यास मार्च महिन्याच्या अखेरीस मंजुरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच सरकारी यंत्रणाही सजग झाली आणि या प्रस्तावावरील धूळ झटकून सद्य:स्थितीची माहिती जमा करण्याचे काम मंत्रालय पातळीवर सुरू झाले.
गेली तीन वर्षे १९० कोटींच्या अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम रेंगाळले होते. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्पाचा २५५ कोटी खर्चाचा स्वतंत्र प्रारुप आराखडा तयार करून घेतला. त्याचे सादरीकरण झाले. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार तीन टप्पे करण्यात आले.
दि. ७ मे २०१५ रोजी तो जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला.
मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी आराखड्याची प्रस्तावना, निकड, बाबनिहाय कारणमीमांसा, एकाच टप्प्यात का कामे करणार? परिपूर्ण आराखडा का नाही आदी बाबींचे स्पष्टीकरण मागवून पुनश्च फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ७ आॅगस्ट २०१५ रोजी फेरप्रस्ताव विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन, पुणे यांना सादर करण्यात आला. सध्या हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी कोल्हापुरात या प्रस्तावास मार्चअखेर मंजुरी देण्याची घोषणा करताच, सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.
प्रस्तावावरील धूळ झटकून कोणकोणती कामे त्यात समाविष्ट आहेत, याची माहिती घेणे तसेच राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी टिप्पणी तयार करण्याच्या कामास सुरुवात केली. (प्रतिनिधी)

अपेक्षा उंचावल्या ...
कोल्हापूर शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन भाजप-शिवसेनेने कोल्हापूरकरांना दिले होते. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करुन अशक्य वाटणारी टोल रद्दची घोषणा प्रत्यक्षात उतरविली. आता अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास मंजूरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप - शिवसेना सरकारकडून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महानगरपालिकेत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आणि राज्यात भाजप - सेनेची सत्ता आहे. त्यामुळे कोणीही प्रतिष्ठेचा विषय न करता केवळ अंबाबार्इंच्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे.

Web Title: Speed ​​of Ambabai Pilgrimage Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.